![]()
सुरतमधील रामस्वरूप मुंडे यांचा २० महिला कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक लाखांहून अधिक रोख बोनस; दिल्लीतील Financersaab कंपनीकडून कर्मचाऱ्यांना iPhone 16 भेट, सोशल मीडियावर उद्योजकांच्या उदारतेची चर्चा.
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दिवाळीला कर्मचाऱ्यांच्या हातावर साखरेचा पुडा ठेवायचा, मिठाईचा डबा द्यायचा आणि त्यालाच मोठा बोनस म्हणायचे, अशी अनेक कंपन्यांची परंपरा असताना गुजरातमधील सुरत येथील एका कापड व्यापाऱ्याने मात्र उदारतेचा नवा आदर्श घालून दिला आहे. महादेव क्लॉथ सेंटरचे मालक रामस्वरूप मुंडे यांनी आपल्या २० महिला कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा रोख दिवाळी बोनस दिला. म्हणजेच या बोनससाठी त्यांनी २० लाख रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली. नोटांचे गठ्ठे सजवलेल्या पूजेच्या ताटांतून कर्मचाऱ्यांना देण्यात आले. या प्रसंगाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर रामस्वरूप मुंडे यांच्या कृतीचे देशभरातून कौतुक होत आहे. कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, ही या भेटीची खरी पावती ठरली.
या भरघोस बोनसामागे केवळ पैशांचे प्रदर्शन नसून रामस्वरूप मुंडे यांची वैयक्तिक संघर्षाची पार्श्वभूमी असल्याचे वृत्तांतून समोर आले आहे. लहानपणी आर्थिक अडचणींचे चटके सहन केल्यामुळे पैशांचे आणि कुटुंबाच्या गरजांचे महत्त्व त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ते केवळ नोकरदार मानत नाहीत, तर कुटुंबाचाच भाग समजतात. आपल्या घरात जशी दिवाळी आनंदात साजरी होते, तशीच त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या घरातही व्हावी, या भावनेतून त्यांनी ही रक्कम दिल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे पत्नीच्या हस्ते कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. उद्योगाच्या भरभराटीत ज्यांच्या श्रमांचा वाटा आहे, त्यांना त्या यशाचा लाभ मिळायला हवा, ही त्यांची भूमिका केवळ भाषणापुरती मर्यादित राहिली नाही.
दुसरीकडे, दिल्लीतील रोहिणी परिसरातील Financersaab या कंपनीनेही दिवाळी भेट म्हणून कर्मचाऱ्यांना Apple कंपनीचे iPhone 16 दिले आहेत. कंपनीच्या अधिकृत Instagram खात्यावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये कर्मचाऱ्यांच्या टेबलवर रंगीत iPhone 16 ठेवलेले दिसतात. या फोनची बाजारातील किंमत साधारण ७० हजार रुपयांच्या आसपास आहे. या भेटीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कंपनीच्या नोकरीच्या संधींबाबत विचारणा केली, तर काहींनी आपल्या कार्यालयात साधा मिठाईचा डबाही मिळत नसल्याची मिश्किल प्रतिक्रिया दिली. मात्र, या दोन्ही घटनांकडे केवळ श्रीमंतीचे प्रदर्शन म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. कारण उद्योग उभा करणाऱ्या मालकाइतकाच तो चालवण्यासाठी घाम गाळणारा कर्मचारीही महत्त्वाचा असतो. दिवाळीचा खरा बोनस म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कष्टांचा सन्मान!
