इतिहासाच्या लाटांवर स्वार टायटॅनिक; रावेतमध्ये प्रदर्शनाला उत्स्फूर्त गर्दी

Spread the love

Loading

जहाजाचा थरार, इतिहासाचे कुतूहल आणि मनोरंजनाचा खजिना; २२ नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना प्रदर्शनाची संधी

महाराष्ट्र 24- पिंपरी-चिंचवड : समुद्राच्या तळाशी विसावलेल्या टायटॅनिक जहाजाचा इतिहास आजही जगाला आकर्षित करतो. शंभर वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी या महाकाय जहाजाच्या दुर्घटनेचे गूढ आणि त्याच्याशी जोडलेल्या आठवणींचे कुतूहल संपलेले नाही. हाच इतिहास नागरिकांच्या डोळ्यांसमोर उभा करण्याचा अनोखा प्रयत्न रावेत येथील मुकाई चौकात करण्यात आला असून, या प्रदर्शनाला पिंपरी-चिंचवडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या प्रदर्शनाला लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटांतील नागरिकांनी भेट दिली. टायटॅनिक जहाजाची भव्य प्रतिकृती, चित्रपटातील प्रसंगांची आठवण करून देणारे देखावे आणि जहाजावरील व्यक्तींच्या प्रतिकृतींसोबत छायाचित्रे काढण्याचा आनंद नागरिकांनी लुटला. इतिहास केवळ पुस्तकात वाचायचा नसतो, तर तो प्रत्यक्ष अनुभवता आला तर त्याची मजाच वेगळी असते, याची प्रचिती या प्रदर्शनातून येत आहे.

डीजे एम्युजमेंट कंपनीच्या वतीने उभारण्यात आलेल्या या प्रदर्शनात टायटॅनिक जहाजाच्या निर्मितीपासून त्याच्या पहिल्या सफरीपर्यंतचा इतिहास उलगडण्यात आला आहे. हे जहाज कोणत्या कंपनीने बांधले, त्याच्या निर्मितीला कोणत्या वर्षी सुरुवात झाली, जहाजाचे मालक कोण होते, त्याचा कर्णधार कोण होता आणि त्याची पहिली समुद्रसफर कधी झाली, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येथे माहितीच्या माध्यमातून मिळतात. टायटॅनिकवरील प्रसिद्ध चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना या दुर्घटनेची ओळख करून दिली; मात्र चित्रपट पाहणे आणि त्या इतिहासाचा प्रत्यक्ष मागोवा घेणे यात मोठा फरक आहे. प्रदर्शनात उभारलेल्या देखाव्यांमुळे जहाजाच्या परिसरात वावरल्याचा अनुभव मिळतो. ज्ञान, कुतूहल आणि मनोरंजन यांचा संगम साधणाऱ्या या उपक्रमामुळे मुलांच्या जिज्ञासेला चालना मिळत असून, पालकांसाठीही ही एक वेगळी पर्वणी ठरत आहे. प्रदर्शनाचे संचालक सुदेश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

इतिहासाची सफर घडवतानाच प्रदर्शनात मनोरंजन आणि खरेदीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. हँडलूम, हस्तकला, विविध प्रकारची खेळणी, पुस्तके आणि खाद्यपदार्थांचे तब्बल ३५ स्टॉल्स येथे उभारण्यात आले आहेत. लहान मुलांसह मोठ्यांसाठी विविध राइड्सची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे हे प्रदर्शन केवळ जहाजाचा इतिहास पाहण्यापुरते मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाचे केंद्र बनले आहे. मुकाई चौकातील मध्यवर्ती ठिकाणी भव्य स्वरूपात उभारण्यात आलेल्या प्रदर्शनात वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे. हे प्रदर्शन आता २२ नोव्हेंबरपर्यंत खुले राहणार आहे. त्यामुळे नागरिकांकडे भेट देण्यासाठी मर्यादित दिवस शिल्लक आहेत. परदेशातील इतिहास घराच्या उंबरठ्यावर येऊन उभा ठाकला असताना, केवळ मोबाईलच्या पडद्यावर मनोरंजन शोधण्यापेक्षा मुलांसह या प्रदर्शनाला भेट देणे अधिक अनुभवसमृद्ध ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *