वॉशिंग्टनमध्ये डर्टी बॉम्ब किंवा रासायनिक हल्ल्याची शक्यता; ट्रम्प यांचा गंभीर इशारा, तेहरानकडून आरोप फेटाळले
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। अमेरिकेच्या राजधानीत बॉम्ब फुटलेला नाही; पण गुप्तचर अहवालाने वॉशिंग्टनच्या सत्ताकेंद्रात धडकी भरवली आहे! इराण ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी ‘डर्टी बॉम्ब’ किंवा रासायनिक शस्त्रांचा वापर करण्याचे पर्याय तपासत असल्याचा दावा अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या अहवालात करण्यात आला आहे. CNN ने सात अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने १७ नोव्हेंबरला हे वृत्त दिले. संभाव्य लक्ष्ये आणि ठिकाणांची माहिती मिळाल्याने अमेरिकेत सुरक्षा यंत्रणांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. मात्र, हा हल्ला तातडीने होणार असल्याचे संकेत नसून इराणकडे प्रत्यक्ष हल्ला घडवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आहे का, याबाबतही अमेरिकी अधिकाऱ्यांमध्ये मतभेद आहेत. म्हणजेच धोका गंभीर मानला जात असला, तरी तो सिद्ध झालेला नाही.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसांत यांना गेल्या आठवड्यात सुरक्षेच्या कारणास्तव लष्करी निवासस्थानी हलवण्यात आल्याचे CNN ने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या लॉरेन बिस यांनी, “सर्व संभाव्य धोक्यांवर लक्ष ठेवले जात आहे; मात्र सध्या देशाला कोणताही विश्वसनीय धोका नाही,” असे स्पष्ट केले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनीला येथे पत्रकारांशी बोलताना अहवालाची गंभीर दखल घेत असल्याचे सांगितले. हल्ला झाल्यास इराणला अभूतपूर्व किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. दुसरीकडे, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते यांनी हा दावा ‘निराधार’ असल्याचे सांगत फेटाळला. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांचा दावा आणि तेहरानचा इन्कार यांतून तणाव आणखी वाढला आहे.
‘डर्टी बॉम्ब’ म्हणजे अणुबॉम्ब नव्हे. पारंपरिक स्फोटकांसोबत किरणोत्सर्गी पदार्थ मिसळून तयार केलेले हे उपकरण स्फोटानंतर परिसरात किरणोत्सर्गी दूषितपणा पसरवू शकते. त्यातून अणुस्फोट होत नाही; मात्र जीवितहानी, आरोग्यधोके, भीती आणि मोठ्या प्रमाणावर स्वच्छता व स्थलांतराची समस्या निर्माण होऊ शकते. त्याचा परिणाम वापरलेल्या पदार्थांवर आणि परिस्थितीवर अवलंबून असतो. अमेरिकेत असे साहित्य आधीच लपवून ठेवल्याचा दावा गुप्तचर सूत्रांनी केल्याचे वृत्त आहे; मात्र त्याची विश्वासार्हता निश्चित झालेली नाही. त्यामुळे ‘डर्टी बॉम्ब अमेरिकेत पोहोचला’ असे म्हणणे सध्या दिशाभूल करणारे ठरेल. प्रत्यक्ष हल्ल्याचा पुरावा नसताना अफवांचा स्फोट होऊ न देणे, हेही सुरक्षेइतकेच महत्त्वाचे आहे.
