आंबीतील अव्हेन्यू सुपरमार्ट्सचा ५०.२७ लाखांचा खाद्यतेल साठा जप्त; आधार, फॉर्च्युन, पतंजली, सफोला तेलांचे नऊ नमुने तपासणीसाठी
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। ग्राहकांच्या विश्वासावर उभ्या असलेल्या मोठ्या किरकोळ विक्री साखळीच्या गोदामातच खाद्यतेलाच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण व्हावा, ही गंभीर बाब आहे. मावळ तालुक्यातील आंबी येथे अव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडच्या (डी-मार्ट) साठवण केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई करून तब्बल २० हजार ८५ लिटर खाद्यतेल जप्त केले आहे. या साठ्याची किंमत ५० लाख २७ हजार ८९३ रुपये आहे. १७ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईची माहिती १८ व १९ नोव्हेंबरला समोर आली. खाद्यतेलाचा दर्जा निर्धारित मानकांनुसार नसण्याची तसेच पॅकेजिंगवरील माहिती दिशाभूल करणारी असण्याची शक्यता तपासणीत आढळल्याने ही जप्ती करण्यात आली. रिफाइंड सूर्यफूल तेल, राइस ब्रॅन तेल, मोहरीचे तेल आणि शेंगदाणा तेलाचा यात समावेश आहे. आधार, फॉर्च्युन, पतंजली आणि सफोला या ब्रँडच्या उत्पादनांचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही कारवाई किरकोळ दुकानावर नव्हे, तर मोठ्या साठवण केंद्रावर झाल्याने खाद्यपदार्थांच्या साठवणुकीपासून वितरणापर्यंतच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एफडीएने एकूण नऊ नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्यामध्ये आधारचे रिफाइंड सूर्यफूल तेल, फॉर्च्युनचे फिजिकली रिफाइंड राइस ब्रॅन ऑइल, पतंजलीचे कच्ची घाणी मोहरी तेल तसेच सफोलाचे कोल्ड प्रेस्ड मोहरी आणि शेंगदाणा तेल यांचा समावेश आहे. पाऊच, बाटल्या आणि ५ व १५ लिटरच्या जारमधील उत्पादनांचे नमुने घेण्यात आले आहेत. मुंबईच्या सहआयुक्त प्रीती तिपरे आणि पुणे विभागाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. पुणे गुप्तवार्ता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे यांनी गोपनीय माहिती संकलित केली होती. त्यानंतर सहायक आयुक्त डी. एस. साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी ए. बी. भिसे आणि एस. एस. हाके यांच्या पथकाने तपासणी केली. अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत दर्जा आणि लेबलिंगच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय असल्याने संपूर्ण साठा ताब्यात घेण्यात आला.
मात्र, येथे एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला हवी. प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याने संबंधित तेल निकृष्ट दर्जाचे किंवा दिशाभूल करणारे असल्याचा अंतिम निष्कर्ष काढता येणार नाही. अहवालानंतरच दोष निश्चित होऊन पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणत्याही ब्रँडला दोषी ठरवण्याची घाई करणे योग्य ठरणार नाही. पण २० हजार लिटरहून अधिक खाद्यतेलाच्या साठ्याबाबत संशय निर्माण होणे ही ग्राहकांसाठी चिंतेची बाब आहे. तेल हा प्रत्येक घरातील रोजच्या स्वयंपाकाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे त्याच्या गुणवत्तेबाबत तडजोड म्हणजे थेट जनतेच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे. एफडीएने केवळ साठा जप्त करून थांबू नये, तर प्रयोगशाळेचे अहवाल वेळेत जाहीर करून दोषींवर कठोर कारवाई करावी. मोठ्या कंपन्यांच्या नावाचा दबदबा असला तरी अन्नसुरक्षेच्या नियमांपुढे कोणालाही विशेष सवलत मिळता कामा नये.
