![]()
गोकुळच्या म्हशीच्या दुधात प्रतिलिटर सहा, तर गायीच्या दुधात चार रुपयांची वाढ; २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून नवे दर लागू, उत्पादकांनाही मिळणार वाढीव मोबदला.
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। महागाईने आधीच सामान्य माणसाच्या संसाराचा हिशेब बिघडवला आहे. त्यात आता चहाच्या कपापासून लहान मुलांच्या पोषणापर्यंत आवश्यक असलेल्या दुधानेही महागाईच्या आगीत तेल ओतले आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ने म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर सहा रुपये, तर गायीच्या दुधाच्या दरात चार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होतील. गोकुळचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी या निर्णयाची माहिती दिली. म्हशीच्या दुधातील ही संघाच्या इतिहासातील मोठ्या दरवाढींपैकी एक असल्याचे वृत्त आहे. मुंबई आणि पुण्यात म्हशीच्या दुधाचा दर ७८ रुपयांवरून थेट ८४ रुपये प्रतिलिटर होणार आहे. कोल्हापुरात ७२ रुपयांवरून ७८ रुपये, तर कोकणात ७६ रुपयांवरून ८२ रुपये मोजावे लागतील. गायीच्या दुधाचे दरही वाढणार असल्याने ग्राहकांच्या मासिक खर्चात भर पडणार आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरेदी दरातही वाढ करण्यात आली आहे. म्हशीच्या दुधासाठी उत्पादकांना प्रतिलिटर तीन रुपये, तर गायीच्या दुधासाठी दोन रुपये अधिक मिळणार आहेत. सहा फॅट आणि नऊ एसएनएफ गुणवत्तेच्या म्हशीच्या दुधाचा खरेदी दर ५५ रुपयांवरून ५८ रुपये, तर ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ गुणवत्तेच्या गायीच्या दुधाचा दर ३७ रुपयांवरून ३९ रुपये होणार आहे. गोकुळचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्या माहितीनुसार, या वाढीमुळे दूध उत्पादकांना दरमहा सुमारे १४ कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळण्याचा अंदाज आहे. संघाचे दररोजचे दूध संकलन सुमारे १७ ते १८ लाख लिटर असून, आठ हजारांहून अधिक प्राथमिक दूध संस्थांचे जाळे आहे. मात्र, शेतकऱ्यांना दिलासा देताना ग्राहकांच्या खिशातून दुप्पट रक्कम काढली जाणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी संघाची आहे.
दरम्यान, गोकुळपाठोपाठ वारणा दूध संघानेही म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात सहा रुपये आणि गायीच्या दुधात चार रुपये प्रतिलिटर वाढ केली आहे. दोन्ही संघांचे नवे दर २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. गोकुळच्या दरवाढीमागे दूध उत्पादकांना वाढीव मोबदला, पशुखाद्य आणि वाहतूक खर्चातील वाढ तसेच संघाची सुमारे ७० कोटी रुपयांची आर्थिक तूट भरून काढण्याची गरज असल्याचे वृत्त आहे. पण प्रश्न असा आहे की, शेतकऱ्यांच्या नावाखाली ग्राहकांच्या खिशावर किती वेळा हात साफ करायचा? दूध ही चैनीची वस्तू नसून प्रत्येक घराची मूलभूत गरज आहे. बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या आहारातील या आवश्यक पदार्थाचे दर वाढवताना सहकारी संस्थांनी स्वतःच्या आर्थिक कारभाराचीही जबाबदारी घ्यायला हवी. अन्यथा उत्पादकांना दिलासा देण्याच्या घोषणेत ग्राहक मात्र महागाईच्या जात्यात भरडला जाईल.
