राज्यभरात २.२३ कोटींचा अन्नसाठा जप्त; २३ आस्थापनांचे परवाने निलंबित, पुण्यात जे. एम. रोडवरील आठ विनानोंदणी विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश, सहा आस्थापनांवर परवाना निलंबनाची कारवाई.
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। Pune Food Safety Drive : खवय्यांच्या पुण्यात खाद्यपदार्थांची चव महत्त्वाची; पण त्या चवीच्या आड आरोग्याशी खेळ सुरू असेल तर कारवाईचा बडगा उगारलाच पाहिजे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या मोहिमेत तब्बल २ कोटी २३ लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून २३ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. पुण्यातील जे. एम. रोडवरील खाऊ गल्लीमध्ये १८ नोव्हेंबर रोजी १७ खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यात आठ विक्रेते वैध अन्ननोंदणी किंवा परवान्याविना व्यवसाय करताना आढळले. त्यांना तातडीने व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. प्रत्येकी ३० हजार रुपयांप्रमाणे दोन लाख ४० हजार रुपयांचा दंड प्रस्तावित करण्यात आला. याशिवाय स्वच्छतेचे गंभीर नियमभंग करणाऱ्या सहा आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले, तर दोन आस्थापनांना त्रुटी सुधारण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. उघड्यावर ठेवलेले खाद्यपदार्थ, वारंवार वापरलेले तळणीचे तेल, अस्वच्छ भांडी, सांडपाण्याचा अभाव आणि कामगारांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसणे, अशी धक्कादायक परिस्थिती तपासणीत उघड झाली.
राज्यव्यापी कारवाईतील सर्वांत मोठा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे उघडकीस आला. मे. डीएक्सपी व्हेंचर्स इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या गोदामात आयात केलेल्या खाद्यपदार्थांवरील उत्पादन तारीख, मुदत समाप्ती तारीख आणि कमाल किरकोळ विक्री किंमत (एमआरपी) थिनरच्या साहाय्याने पुसून त्यावर नव्या तारखा आणि किमती छापल्या जात असल्याचा प्रकार आढळला. १८ नोव्हेंबरच्या छाप्यात तब्बल २ कोटी ६ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. यात स्पार्कलिंग वॉटर, एनर्जी ड्रिंक्स, सोडा आणि विविध प्रकारच्या ए२ बिलोना तुपाचा समावेश आहे. तारखा व एमआरपी छापण्यासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्रीही जप्त करण्यात आली. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील कलम २३, २६ आणि २७ अंतर्गत प्रथमदर्शनी उल्लंघन आढळले असून पुढील तपास सुरू आहे. राज्यातील २३ निलंबित परवान्यांपैकी मुंबई विभागातील सहा, पुणे विभागातील दहा, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येकी एक, तर पंढरपूरमधील चार आस्थापनांचा समावेश आहे. कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील ५४ हॉटेल, मिठाई दुकाने आणि प्रसाद विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. ठाणे, रायगड आणि पुणे येथे चहा मिश्रण, तूप व जेलीपॉपचा ६८ हजार ९४ रुपयांचा साठाही जप्त करण्यात आला.
प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूविरोधातील स्वतंत्र कारवाईत कोकण विभागात १६ लाख ४३ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणांत तीन गुन्हे दाखल करून सहा जणांना अटक करण्यात आली; नाशिक विभागात आणखी एक गुन्हा दाखल करून एकाला अटक करण्यात आली. म्हणजेच एकूण चार गुन्हे आणि सात अटकांची नोंद आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील ही कारवाई निश्चितच स्वागतार्ह आहे; मात्र कारवाईचा खरा परिणाम विक्रेत्यांच्या सवयी बदलण्यात दिसला पाहिजे. पुण्यातील खाऊ गल्ल्या केवळ चवीसाठी प्रसिद्ध असाव्यात, आजारांचे अड्डे म्हणून नव्हे. आठ विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याची नोटीस दिल्यानंतरही ते पुन्हा दुकाने थाटत असतील, तर केवळ नोटिसांचा धाक किती दिवस टिकणार? ग्राहकांच्या ताटात काय वाढले जाते, याची जबाबदारी प्रशासनाने नियमित तपासणीतून निश्चित केली पाहिजे. जप्तीचे कोट्यवधींचे आकडे मथळ्यांत झळकण्यापेक्षा भेसळमुक्त अन्न नागरिकांना मिळणे अधिक महत्त्वाचे आहे.
