मध्यरात्रीनंतर नाल्यातून उग्र दुर्गंधीचा कहर; महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीने प्रश्न सुटणार कधी?
महाराष्ट्र 24 ऑनलाईन दि.20 – काळभोर नगरातील नाला म्हणजे आता नागरिकांसाठी नाक दाबून जगण्याची शिक्षा ठरत आहे! रात्री बारा वाजल्यानंतर या नाल्यातून येणाऱ्या केमिकलयुक्त पाण्याच्या उग्र दुर्गंधीने सूर्योदय कॉम्प्लेक्स आणि जय टॉवरमधील रहिवाशांचे जगणे अक्षरशः मुश्कील केले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना या दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, उलट्या आणि डोळ्यांची जळजळ अशा तक्रारी जाणवत आहेत. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या व्यवस्थेला नागरिकांच्या नाकातोंडात घुसणारा हा दुर्गंधीचा प्रश्न मात्र अद्याप का दिसत नाही, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. नाल्यातून वाहणारे पाणी की नागरिकांच्या आरोग्यावर सोडलेले रसायनांचे संकट, याचे उत्तर आता मिळालेच पाहिजे!
या गंभीर प्रकाराची दखल घेत नगरसेविका सौ. अरुणा गणेश लंगोटे यांनी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या मुख्य अभियंत्यांना लेखी निवेदन दिले. केवळ पत्र देऊन कर्तव्य संपवण्याऐवजी त्यांनी तातडीने पाठपुरावाही केला. महापालिका अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला याबाबत कळवले. तसेच लंगोटे यांनी स्वतः उपप्रादेशिक अधिकारी श्री. मंचक जाधव यांच्याशी संपर्क साधून या प्रश्नाकडे लक्ष वेधले. अखेर १८ नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
मात्र, प्रश्न केवळ पाहणीचा नाही, तर नागरिकांना मोकळा श्वास देण्याचा आहे! अधिकारी आले, पाहणी झाली, आश्वासन मिळाले; पण या सगळ्यामुळे नाल्यातील रसायने थांबणार आहेत का? दुर्गंधी कायमची नाहीशी होणार आहे का? की नागरिकांनी पुन्हा रात्री बारा वाजल्यानंतर नाक दाबून घरात बसायचे? प्रदूषण करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे, केमिकलयुक्त पाण्याचा स्रोत शोधणे आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात असताना आश्वासनांचे गोडवे गाण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीचा अहवाल समोर यायला हवा. काळभोर नगरकरांची मागणी एकच—नाल्यातील विषारी दुर्गंधी थांबवा आणि आम्हाला मोकळा श्वास घेऊ द्या!