![]()
शेतकऱ्यांना म्हशीच्या दुधासाठी तीन, गायीच्या दुधासाठी दोन रुपये जादा; ग्राहकांना मात्र प्रतिलिटर सहा आणि चार रुपयांचा भुर्दंड
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दुधाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही आणि आता दूध खरेदी करताना खिशाचा विचार करावा लागणार आहे. गोकुळपाठोपाठ वारणा दूध संघानेही दरवाढीचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांच्या घरखर्चात आणखी भर पडणार आहे. शनिवार, २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत. वारणाने म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपये, तर गायीच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ केली आहे. मात्र ग्राहकांसाठी म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात सहा रुपये आणि गायीच्या दुधात चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्यात वारणाच्या म्हशीच्या दुधाचा दर ७८ रुपयांवरून ८४ रुपये, कोकणात ७६ वरून ८२ रुपये, तर कोल्हापुरात ७२ वरून ७८ रुपये प्रतिलिटर झाला आहे. वारणा दूध संघाचे अध्यक्ष एच. आर. जाधव यांनी पशुखाद्य, जनावरांचे संगोपन, पशुवैद्यकीय सेवा आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे दरवाढ आवश्यक ठरल्याचे स्पष्ट केले. वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनीही दूध प्रक्रिया आणि आनुषंगिक खर्च वाढल्याचे सांगितले. संघाच्या प्रकल्पाची दररोज सात लाख लिटर दूध उत्पादन क्षमता आहे. त्यामुळे या निर्णयाचा परिणाम मोठ्या ग्राहकवर्गावर होणार आहे.
दरम्यान, गोकुळ दूध संघानेही २१ नोव्हेंबरपासून म्हशीच्या दूध खरेदी दरात तीन रुपये आणि गायीच्या दूध खरेदी दरात दोन रुपये वाढ केली आहे. ६.० फॅट आणि ९.० एसएनएफ गुणवत्तेच्या म्हशीच्या दुधाचा खरेदी दर ५५ रुपयांवरून ५८ रुपये, तर ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ गुणवत्तेच्या गायीच्या दुधाचा दर ३७ रुपयांवरून ३९ रुपये झाला आहे. गोकुळचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निर्णयामुळे संलग्न दूध उत्पादकांना दरमहा सुमारे १४ कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम मिळण्याचा अंदाज आहे. संघाशी संलग्न आठ हजार २०० प्राथमिक दूध संस्थांमधून दररोज १७ ते १८ लाख लिटर दूध संकलित होते. म्हशीच्या दूध खरेदी दरातील तीन रुपयांची वाढ गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक असल्याचे संघाने म्हटले आहे. मात्र, उत्पादक शेतकऱ्यांचे समाधान झालेले नाही. पशुखाद्य, चारा, औषधे आणि मजुरीचा खर्च वाढल्याने किमान पाच रुपये प्रतिलिटर वाढ मिळावी, अशी मागणी काही दूध उत्पादकांनी केली आहे.
यंदा पावसाचे अनियमित आगमन, चाऱ्याची कमतरता आणि जनावरांच्या संगोपनाचा वाढता खर्च यामुळे दुग्ध व्यवसायाचे आर्थिक गणित बिघडले आहे. शेतकऱ्यांना वाढीव दर देणे आवश्यक असले, तरी त्याचा संपूर्ण भार ग्राहकांच्या माथी मारणे हा कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही. दूध ही चैनीची वस्तू नसून प्रत्येक घराची गरज आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या आहारात त्याचे महत्त्व आहे. गोकुळ आणि वारणा या दोन्ही संघांनी उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला, तरी ग्राहकांच्या मासिक खर्चात आता वाढ होणार आहे. शेतकऱ्याला योग्य मोबदला आणि ग्राहकाला परवडणारे दूध या दोन्ही गोष्टींचा समतोल राखण्याची जबाबदारी दूध संघांची आहे. अन्यथा दरवाढीचा फायदा उत्पादकाला किती आणि फटका ग्राहकाला किती, हा प्रश्न अनुत्तरितच राहील.
