जनगणना २०२७: जानेवारीत घराघरांत मोजणी

Spread the love

Loading

१० ते २४ जानेवारीदरम्यान ऑनलाइन स्वयं-गणना; २५ जानेवारीपासून प्रगणकांची घरभेट, महाराष्ट्रात सुमारे २.८२ लाख कर्मचारी तैनात होणार

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। देशाची लोकसंख्या किती, कोण कुठे राहतो, कोणता व्यवसाय करतो आणि समाजाची बदलती रचना काय सांगते, याची अधिकृत नोंद करण्यासाठी जनगणना २०२७ चा दुसरा टप्पा सज्ज झाला आहे. महाराष्ट्रात १० ते २४ जानेवारी २०२७ या काळात नागरिकांना ऑनलाइन स्वयं-गणनेचा पर्याय उपलब्ध होणार असून, २५ जानेवारीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत प्रगणक घरोघरी जाऊन लोकसंख्येची नोंद घेणार आहेत. २१ नोव्हेंबर रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात प्रधान जनगणना अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय परिषद झाली. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या आभासी उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन झाले. जनगणनेचे काम अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले. कारण जनगणना ही केवळ माणसांची मोजदाद नसून भविष्यातील शाळा, रुग्णालये, पाणीपुरवठा, वाहतूक आणि विकासनियोजनाचा पाया आहे. आकडेवारी चुकीची असेल, तर नियोजनाचे गणितही चुकणार; त्यामुळे कागदोपत्री पूर्ततेपेक्षा प्रत्यक्ष अचूकतेला महत्त्व द्यावे लागणार आहे.

या टप्प्यात नागरिकांना अधिकृत पोर्टलवर स्वतःच्या कुटुंबाची माहिती भरता येईल. स्वयं-गणना ऐच्छिक आहे; ती केली नाही तरी प्रगणक घरी येणारच आहेत. ऑनलाइन माहिती भरल्यानंतर मिळणारा स्वयं-गणना ओळख क्रमांक (SE ID) प्रगणकाला दाखवावा लागेल. डिजिटल प्रश्नावलीत ४० प्रश्न असून नाव, कुटुंबप्रमुखाशी नाते, लिंग, वय, वैवाहिक स्थिती, धर्म, जात, दिव्यांगत्व, मातृभाषा, शिक्षण, व्यवसाय, रोजगार आणि स्थलांतर यांसारख्या बाबींची माहिती घेतली जाणार आहे. ही सुविधा १६ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. माहिती संकलनासाठी मोबाइल ॲपचा वापर होणार असून, ऑनलाइन नोंदणीमुळे घरभेटीची प्रक्रिया रद्द होणार नाही. जनगणनेची संदर्भ तारीख १ मार्च २०२७ रोजी मध्यरात्री १२ वाजता निश्चित करण्यात आली आहे. बेघर लोकसंख्येची गणना २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री होणार आहे.

महाराष्ट्रात या कामासाठी सुमारे २.८२ लाख प्रगणक आणि पर्यवेक्षकांची यंत्रणा उभी केली जात आहे. १ ते ५ मार्च २०२७ दरम्यान पुनरावलोकन फेरी होईल. मास्टर ट्रेनर्स, जिल्हा व चार्ज अधिकारी आणि तांत्रिक सहाय्यकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण सुरू आहे. परिषदेत भारताचे महानिबंधक कार्यालयाचे उपमहानिबंधक जसपाल सिंग, विभागीय आयुक्त, प्रधान जनगणना अधिकारी, मुंबईतील जनगणना कार्य संचालनालयाचे अधिकारी आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले. पहिला टप्पा म्हणजे घरयादी व घरगणना महाराष्ट्रात पूर्ण झाल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात नागरिकांची प्रत्यक्ष माहिती संकलित होणार आहे. जनगणना अधिनियम, १९४८ नुसार संकलित वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवली जाते आणि सांख्यिकीय व विकासनियोजनासाठीच वापरली जाते. त्यामुळे अफवांना बळी न पडता अधिकृत प्रगणकांना सहकार्य करणे आणि अचूक माहिती देणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *