![]()
१५ हजार कोटींचा नवा ग्रीनफिल्ड महामार्ग; १३० किलोमीटर लांबीचा प्रस्तावित मार्ग, पागोटे ते चौक पहिला टप्पा; पुणे-बंगळुरू कनेक्टिव्हिटीलाही मिळणार नवी गती
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। Mumbai Pune New Highway : मुंबई-पुणे प्रवासात तीन-चार तास वाहतूक कोंडीत घालवणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारा नवा महामार्ग उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडण्यासाठी सुमारे १३० किलोमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड महामार्ग प्रस्तावित असून, त्यासाठी अंदाजे १५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग आठ पदरी, नियंत्रित प्रवेशाचा असणार असल्याचा प्रस्ताव आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते पुणे प्रवासाचा कालावधी ९० मिनिटांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली होती. सध्याच्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाढता वाहनभार, वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका लक्षात घेता पर्यायी मार्गाची गरज निर्माण झाली आहे. मात्र, ९० मिनिटांचा प्रवास हा सध्या प्रत्यक्षात आलेला चमत्कार नसून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अपेक्षित असलेला दावा आहे.

या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील जेएनपीए बंदराजवळील पागोटे ते चौकदरम्यान २९.२१९ किलोमीटरचा सहा पदरी ग्रीनफिल्ड महामार्ग उभारण्यात येणार आहे. या टप्प्यासाठी ४ हजार ५००.६२ कोटी रुपयांची मंजुरी असून, सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून दोन बोगदे बांधण्याचे नियोजन आहे. दुसऱ्या टप्प्यात चौक ते पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील शिवरेपर्यंत सुमारे १०० किलोमीटरचा मार्ग विकसित केला जाणार आहे. या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) आणि व्यवहार्यता अभ्यासासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या कामासाठी निविदा उघडण्याची तारीख २७ नोव्हेंबर २०२६ निश्चित असल्याचे वृत्त आहे. मात्र, पागोटे-चौक या पहिल्या टप्प्याच्या बांधकाम निविदेची मुदत २४ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची नोंद केंद्राच्या ई-निविदा पोर्टलवर आहे. या दोन्ही निविदा वेगवेगळ्या असल्याने त्यांची गल्लत करू नये.
नव्या मार्गाचा खरा फायदा केवळ मुंबई-पुणे प्रवासापुरता मर्यादित राहणार नाही. अटल सेतू, जेएनपीए बंदर, नवी मुंबई, पनवेल, पुणे रिंगरोड आणि पुढे पुणे-बंगळुरू महामार्ग यांना जोडणारी वाहतूक साखळी अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः पुणे शहरातील वाहतूक कोंडीत अडकण्याऐवजी बाह्य मार्गाने पुढे जाण्याचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. मालवाहतूक, उद्योग, बंदरव्यवहार आणि पर्यटनालाही त्याचा लाभ मिळू शकतो. मात्र, १५ हजार कोटींचा खर्च, भूसंपादन, पर्यावरणीय परवानग्या आणि प्रत्यक्ष बांधकामाची गती या कसोट्यांवरच प्रकल्पाचे यश ठरणार आहे. कागदावर दीड तासांचा प्रवास दाखवणे सोपे; प्रत्यक्षात तो वेळेत पूर्ण करून दाखवणे हेच सरकार आणि NHAI समोरचे खरे आव्हान आहे.