नारीशक्तीतून मानवतेचा एकतेचा संदेश

Spread the love

Loading

खराडीतील निरंकारी महिला संत समागमाला पाच हजार महिलांची उपस्थिती; डॉ. प्रवीण खुल्लर यांचे ब्रह्मज्ञान, संस्कार, समर्पण आणि स्त्रीशक्तीच्या भूमिकेवर मार्गदर्शन

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। स्त्रीला कधी घराची लक्ष्मी, कधी कुटुंबाचा आधार तर कधी संस्कारांची जननी म्हणून गौरवले जाते. मात्र, तिच्या कर्तृत्वाचा गौरव केवळ चार भिंतींत आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांत अडकवून चालणार नाही. समाजाची मानसिकता घडविण्याची ताकदही तिच्यातच आहे, हा विचार संत निरंकारी मिशनच्या महिला संत समागमातून मांडण्यात आला. सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या आशीर्वादाने रविवार, २२ नोव्हेंबर रोजी खराडी येथील महालक्ष्मी लॉन्समध्ये पुणे झोनचा महिला संत समागम उत्साहात पार पडला. सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत झालेल्या कार्यक्रमाला पुणे झोनमधील विविध शाखांच्या पाच हजारांहून अधिक महिला भाविक उपस्थित होत्या. विचार, भक्तिगीते आणि लघुनाटिकांच्या माध्यमातून नारीशक्ती, कौटुंबिक जबाबदारी, आध्यात्मिक जागृती आणि मानव एकतेचा संदेश देण्यात आला.

मुख्य वक्त्या डॉ. प्रवीण खुल्लर जी यांनी सत्गुरू आणि निरंकार प्रभूशी दृढ विश्वास, कृतज्ञता आणि समर्पणाने जोडलेले राहण्याचे महत्त्व विशद केले. स्त्री ही आई, मुलगी, बहीण, पत्नी आणि सून अशा अनेक भूमिका पार पाडते; मात्र तिची खरी ताकद केवळ नाती निभावण्यात नसून पुढील पिढीच्या विचारांना आकार देण्यात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मुलांच्या मनात जात, धर्म, भाषा आणि आर्थिक परिस्थितीवर आधारित भेदभाव रुजू न देता प्रेम, समानता आणि परस्पर आदराचे संस्कार रुजविण्याची जबाबदारी महिलांनी ओळखावी, असे आवाहन त्यांनी केले. ब्रह्मज्ञानामुळे संपूर्ण मानवजात एकाच परमपित्याची संतान असल्याची जाणीव होते. प्रत्येक व्यक्तीकडे निरंकाराचे अस्तित्व म्हणून पाहण्याची दृष्टी निर्माण झाली, तर समाजातील द्वेष, अहंकार आणि भेदाभेदाला जागा उरणार नाही, हा विचारही त्यांनी मांडला.

अध्यात्म म्हणजे केवळ कर्मकांड, पूजा-अर्चा किंवा धार्मिक विधींची उजळणी नव्हे; तर स्वतःच्या वास्तविक स्वरूपाची ओळख करून घेण्याचा मार्ग आहे, असे डॉ. प्रवीण खुल्लर यांनी सांगितले. सत्गुरूंच्या कृपेने प्राप्त होणारे ब्रह्मज्ञान मनातील अहंकार कमी करून विनम्रता, कृतज्ञता आणि समर्पणाची भावना वाढवते. परमात्मा सदैव आपल्या सोबत असल्याची अनुभूती आल्यास जीवनातील भय आणि चिंता कमी होऊन कौटुंबिक जीवन अधिक शांततामय होऊ शकते. समागमाच्या समारोपावेळी उपस्थित भाविकांना मानव जीवनाची संधी सार्थक करण्यासाठी प्रेम, सेवा, समर्पण आणि मानव एकतेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. हजारोंच्या उपस्थितीत झालेल्या या आयोजनाने नारीशक्तीचा गौरव केला; मात्र या विचारांचे खरे यश सभागृहाबाहेर दैनंदिन जीवनात समानता आणि माणुसकीची कृतीतून अंमलबजावणी झाली, तरच सिद्ध होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *