एसटी प्रवाशांना रिचार्जचा दिलासा !

Spread the love

Loading

एनसीएमसी कार्डवरील ११.८० रुपयांचे कमिशन रद्द; आता पाच रुपयांपासून टॉपअप, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा अतिरिक्त खर्च कमी होणार

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। एसटीचा प्रवास स्वस्त, पण सवलतीचे कार्ड रिचार्ज करताना अतिरिक्त शुल्काचा भुर्दंड! या विचित्र कारभाराविरोधात प्रवाशांनी आवाज उठवल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) अखेर माघार घेतली आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डच्या (एनसीएमसी) रिचार्जवर आकारले जाणारे ११.८० रुपयांचे कमिशन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक सवलतधारकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. यापूर्वी प्रत्येक टॉपअप व्यवहारामागे अधिकृत एजंटला ११.८० रुपये कमिशन दिले जात होते. ही रक्कम वजा झाल्यानंतर कार्डमध्ये प्रत्यक्ष जमा होणारी रक्कम कमी होत असे. आता कमिशनची तरतूद बंद करून अधिकृत एजंट आणि एसटी वाहकांकडून टॉपअपसाठी एकसमान शुल्क आकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र व्यवहारावरील लागू कर कायम राहणार आहे. त्यामुळे कमिशन रद्द झाले म्हणजे रिचार्ज पूर्णपणे शुल्कमुक्त झाला, असा गैरसमज प्रवाशांनी करून घेऊ नये.

दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे रिचार्जची मर्यादा. आतापर्यंत ५० रुपयांच्या पटीत पैसे भरावे लागत असल्याने ग्रामीण भागातील कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या कार्डमध्ये अनावश्यक रक्कम अडकून राहत होती. आता पाच रुपयांच्या पटीत म्हणजेच ५, १०, १५, २०, २५ अशा रकमांचे रिचार्ज करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना गरजेपुरतीच रक्कम जमा करता येईल. विशेष म्हणजे कार्डच्या मागील बाजूचा क्यूआर कोड स्कॅन करून भीम (BHIM) ॲपद्वारेही रिचार्ज करता येतो. ही डिजिटल सुविधा १५ सप्टेंबरपासून उपलब्ध असून वाहक, बसस्थानकांवरील टॉपअप काउंटर आणि अधिकृत एजंटांकडूनही रिचार्ज करता येणार आहे. २३ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील १ कोटी ४७ लाख सवलतधारकांनी कार्डसाठी नोंदणी केली असून १ कोटी २९ लाख कार्ड सक्रिय झाली आहेत.

दरम्यान, अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांना एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत कार्ड नसतानाही सवलतीचा लाभ घेता येणार असून १ जानेवारी २०२७ पासून सवलतींसाठी कार्ड अनिवार्य होणार आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यापूर्वीही कार्ड सक्तीच्या मुदतीत वाढ जाहीर केली होती. प्रवाशांच्या मागणीनंतर कमिशन आणि रिचार्जच्या रकमेबाबतही बदल करण्यात आले. मात्र, डिजिटल व्यवस्था उभी करताना सामान्य प्रवाशांच्या खिशाचा विचार सुरुवातीलाच झाला असता, तर तक्रारींची वेळ आली नसती. एसटी ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे; तिच्या सवलतींचा लाभ घेताना प्रवाशांना तांत्रिक अडथळे आणि अतिरिक्त शुल्काचा त्रास होऊ नये, एवढीच अपेक्षा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *