मुंढे यांच्या FDA ची धडक कारवाई; पुणे स्टेशन, कॅम्प, हडपसर, कोंढवा आणि शिवाजीनगरमधील आस्थापनांवर अस्वच्छता व अन्नसुरक्षा नियमभंगाचा ठपका
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। ग्राहकांच्या ताटात चविष्ट पदार्थ वाढताना स्वच्छतेचा मात्र पत्ता नसल्याचे धक्कादायक चित्र पुण्यात पुन्हा समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेत हॉटेल व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे स्टेशन, कॅम्प, एम.जी. रोड, हडपसर आणि कोंढवा परिसरातील आठ हॉटेल्सचे परवाने २० नोव्हेंबरच्या तपासणीनंतर निलंबित करण्यात आले. यामध्ये मे. मेट्रो रेस्टॉरंट, मे. शौनिक हॉस्पिटॅलिटीचे सहाना व्हेज रेस्टॉरंट, मे. शिवाय कॉर्नर, मे. ग्रँड दिल्ली दरबार हॉस्पिटॅलिटी इंडिया प्रा. लि., मे. राजे चायनीज फास्ट फूड अँड ज्यूस बार, पी.जे.एस. हॉस्पिटॅलिटीचे कॅफे ट्यून्स (द बर्गर बार्न कॅफे), मे. महादेव फूड्स आणि मे. फिरोज केटरर्स यांचा समावेश आहे. अन्न विक्रीच्या नावाखाली ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे.
कारवाईमागील कारणेही गंभीर आहेत. तपासणीत स्वयंपाकघरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव आणि अन्नपदार्थांमध्ये कृत्रिम रंगांचा वापर आढळल्याचे वृत्त आहे. मेट्रो रेस्टॉरंटमध्ये मोनोसोडियम ग्लुटामेटचा (MSG) अतिरिक्त वापरही निदर्शनास आला. सहाना व्हेज रेस्टॉरंट, शिवाय कॉर्नर, राजे चायनीज, कॅफे ट्यून्स आणि फिरोज केटरर्स येथे कृत्रिम रंग वापरल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय शिवाजीनगर परिसरातील ग्रीनलँड रेस्टॉरंट, शैलजा रेस्टॉरंट अँड बीअर बार, चैतन्य पराठाज (व्हेज), सहाना व्हेज रेस्टॉरंट, रश्मी एंटरप्रायझेस, क्युबॅनोस-अरोमा हॉस्पिटॅलिटी आणि इन्स्टामार्ट-राजधी रिटेल प्रा. लि. यांच्यावरही कारवाई झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ग्राहकांना अन्न देणाऱ्यांनीच स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवले, तर आरोग्याची हमी कोण देणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या कारवाईच्या पार्श्वभूमीवर FDA चे सहआयुक्त श्रीकांत कारकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त नारायण सरकाटे आणि अन्न सुरक्षा अधिकारी सतीश हाके, प्रिया राजगोळकर, दीपाली घोडके व पूजा घोडके यांनी तपासणी मोहिमेत सहभाग घेतल्याचे वृत्त आहे. मात्र, परवाना निलंबित झाला म्हणजे दोषींवरील कारवाई संपली, असे नाही. संबंधित आस्थापनांनी त्रुटी दूर करून प्रशासनाची लेखी परवानगी मिळेपर्यंत व्यवसाय सुरू करता येत नाही. हॉटेल चालकांनी स्वच्छता, अन्नसाठवणूक आणि अन्नसुरक्षा नियम पाळणे बंधनकारक आहे. ग्राहकांनीही संशयास्पद अन्नपदार्थ आढळल्यास FDA च्या १८०० २२२ ३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी. शहरातील खवय्यांना सुरक्षित अन्न मिळणे हा उपकार नसून त्यांचा अधिकार आहे.
