बालेवाडीची दोन मेट्रो स्थानके सुरू

Spread the love

Loading

हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा स्थानकांवरून २४ नोव्हेंबरपासून प्रवासी सेवा; हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावरील कार्यान्वित स्थानकांची संख्या १९ वर

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। पुणेकरांच्या मेट्रो प्रवासात आणखी दोन स्थानकांची भर पडली आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके २४ नोव्हेंबरपासून प्रवाशांसाठी खुली झाली आहेत. दुपारी ३.३० वाजल्यापासून या दोन्ही स्थानकांवरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्क आणि शिवाजीनगरदरम्यान प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मेट्रोचे उद्घाटन ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले होते. त्यानंतर ४ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू झाली. सुरुवातीला २३ पैकी १७ स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्यात आली होती. आता दोन स्थानकांची भर पडल्याने कार्यान्वित स्थानकांची संख्या १९ झाली आहे.

या मार्गावरील प्रवासी सेवेला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत असून दररोज सुमारे ५० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे (PITCMRL) मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी यांनीही नव्या स्थानकांमुळे प्रवासीसंख्या आणखी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्या या मार्गावर २० गाड्यांच्या माध्यमातून दररोज सुमारे ३०० फेऱ्या चालवल्या जात आहेत. गर्दीच्या वेळेत पाच मिनिटांनी, तर इतर वेळेत आठ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध आहे. जिल्हा न्यायालय आणि वाकड चौक स्थानकांवरील गर्दी हाताळण्यासाठी अतिरिक्त स्वयंचलित तिकीट तपासणी यंत्रणा आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

दोन स्थानके सुरू झाल्यानंतरही बाणेर गाव, बाणेर-पाषाण लिंक रोड, भोसलेनगर आणि शिवाजीनगर ही चार स्थानके पूर्णपणे कार्यान्वित होण्याची प्रतीक्षा कायम आहे. २३.२ किलोमीटरच्या या मार्गावरील सर्व स्थानके सुरू झाल्यानंतरच मेट्रोचा अपेक्षित लाभ व्यापक प्रमाणावर मिळेल. उद्घाटनाचे फित कापणे सोपे; पण प्रत्येक स्थानकावर सुरक्षित, वेळेवर आणि अखंड सेवा देणे हीच खरी कसोटी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *