![]()
१ डिसेंबरपासून नियमांची कठोर अंमलबजावणी; वेळ ओलांडल्यास ५०० रुपये दंड, एएनपीआर कॅमेऱ्यांची नजर आणि एअरो मॉलमध्ये पार्किंगचा पर्याय
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। पुणे विमानतळावर नातेवाइकांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांना आता वेळेचे भान ठेवावे लागणार आहे. विमानतळाच्या पिकअप-ड्रॉप मार्गिकेत वाहन उभे करण्यासाठी केवळ १५ मिनिटांची मर्यादा निश्चित करण्यात आली असून, ती ओलांडणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. १ डिसेंबरपासून या नियमाची कठोर अंमलबजावणी सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, या १५ मिनिटांत प्रवाशांना वाहनात चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी पाच मिनिटांचा प्रत्यक्ष अवधी समाविष्ट आहे. त्यामुळे प्रवाशांची वाट पाहण्यासाठी विमानतळाच्या प्रवेशद्वारावर तासन्तास वाहन उभे ठेवण्याची सवय आता महागात पडणार आहे. विमानतळावरील प्रवाशांची वाढती संख्या, वाहनांची गर्दी आणि प्रवेश-निर्गमन मार्गिकांवरील कोंडी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत वाहनचालकांना नव्या व्यवस्थेची माहिती देण्यासाठी प्रायोगिक अंमलबजावणी सुरू असून, या कालावधीत दंड आकारला जाणार नाही.
नियम मोडणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विमानतळावर स्वयंचलित क्रमांक ओळख प्रणाली अर्थात एएनपीआर (ANPR) कार्यान्वित करण्यात आली आहे. पिकअप-ड्रॉप मार्गिकेच्या प्रवेश आणि निर्गमन ठिकाणी बसवलेले कॅमेरे वाहनांचे क्रमांक आणि छायाचित्रे नोंदवतील. वाहनाने प्रवेश केल्यापासून बाहेर पडेपर्यंतचा कालावधी संगणकीय पद्धतीने मोजला जाणार आहे. १५ मिनिटांची मर्यादा ओलांडल्यास ५०० रुपयांचा दंड आकारला जाईल. त्यासाठी फास्टॅग किंवा क्यूआर कोडद्वारे डिजिटल भरणा करण्याची सुविधा उपलब्ध असेल. पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी अनावश्यक वेळ वाहन उभे ठेवल्यामुळे इतर वाहनांच्या वाहतुकीत अडथळे निर्माण होत असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही या तंत्रज्ञानाधारित व्यवस्थेमुळे वाहतूक शिस्त सुधारेल आणि प्रवाशांचा वेळ वाचेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान, विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला १५ मिनिटांतच सर्व व्यवहार उरकणे शक्य होईल, असे गृहीत धरणेही योग्य ठरणार नाही. विमान उशिरा येणे, सामान मिळण्यास विलंब होणे किंवा ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना मदत करण्यासाठी अधिक वेळ लागणे, अशा परिस्थितीत वाहनचालकांनी नेमके काय करायचे, हा व्यावहारिक प्रश्न आहे. अशा वेळी वाहनचालकांना मल्टिलेव्हल कार पार्किंग (MLCP) किंवा ‘एअरो मॉल’मधील पार्किंगचा वापर करावा लागणार आहे. तेथून मुख्य टर्मिनलपर्यंत मोफत बससेवा उपलब्ध आहे. दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या विमानतळ परिसरात शिस्त आवश्यक असली, तरी दंड आकारताना यंत्रणेने पारदर्शकता आणि प्रवाशांच्या अडचणींचाही विचार करणे गरजेचे आहे. वाहतूक कोंडी कमी करण्याच्या नावाखाली प्रवाशांची गैरसोय वाढू नये, हीच खरी कसोटी ठरणार आहे
