![]()
अनधिकृत बांधकामे, पदपथ आणि नाल्यांवरील कब्जे हटविण्याचे आदेश; विरोधकांवर गुन्हे दाखल होणार, ६५ आरएमसी प्लांटही प्रशासनाच्या रडारवर
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। पिंपरी-चिंचवड शहरात अतिक्रमणधारकांनी सार्वजनिक जागांना स्वतःची खासगी मालमत्ता समजण्याचा प्रकार आता महापालिका प्रशासनाच्या रडारवर आला आहे. पदपथांवर दुकाने, रस्त्यांवर अडथळे आणि अनधिकृत बांधकामांच्या माध्यमातून नागरिकांच्या हक्काच्या जागेवर कब्जा करणाऱ्यांविरोधात थेट कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. बुधवार (२५ नोव्हेंबर) झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि बांधकाम परवानगी विभागाला कारवाईचा वेग वाढविण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे, कारवाई केवळ कागदावर न राहता आपण स्वतः संबंधित ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनधिकृत दुकाने आणि बांधकामे हटवून पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करावेत, त्यांची सलग जोडणी कायम ठेवावी, तसेच कारवाईत अडथळा आणून शासकीय कामात हस्तक्षेप करणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करावेत, असा इशाराही त्यांनी दिला.
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मनोज सेठिया, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर, उपायुक्त संदीप खोत, सीताराम बहुरे, राजेश आगळे, अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, मुकेश कोळप, अजिंक्य येळे, अश्विनी गायकवाड, निवेदिता घार्गे आणि परशुराम वाघमोडे उपस्थित होते. आयुक्तांनी नाल्यांवरील अतिक्रमणे हटवून पाण्याचा प्रवाह मोकळा ठेवण्याचे आदेश दिले. बांधकाम व्यावसायिकांनी उभारलेले अनधिकृत कल्व्हर्ट त्यांनीच हटवावेत, तर सोसायट्यांनी बांधलेले कल्व्हर्ट हटविण्याची जबाबदारी संबंधित सोसायट्यांची असेल. पावसाचे पाणी अडवून किंवा वळवून नागरिकांच्या मालमत्तांना धोका निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे निर्देश देण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी कचरा साचू नये, प्रशासकीय इमारतीतील गळती दुरुस्त करावी आणि बीआरटी मार्गालगतच्या पार्किंगचा योग्य वापर व्हावा, यावरही त्यांनी भर दिला.
बैठकीत शहरातील ६५ रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांटचाही विषय ऐरणीवर आला. या प्लांटनी नियम आणि निकषांचे पालन करणे बंधनकारक असून, त्यांच्यासाठी स्वतंत्र झोन आणि योग्य जागा निश्चित करण्याचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले. व्यावसायिक वापरासाठी आवश्यक परवानग्या नसलेल्या प्लांटवरही लक्ष ठेवले जाणार आहे. चिखली येथील घरकुल परिसरात पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी नाला बांधणी आणि पर्यायी पाणीनिचऱ्याची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, शहरात यापूर्वीही अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमा राबवून हजारो चौरस फुटांची जागा मोकळी केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तरीही अतिक्रमणे पुन्हा उभी राहत असतील, तर कारवाईतील सातत्य आणि देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे. आता आयुक्तांच्या आदेशांचे प्रत्यक्ष परिणाम किती दिसतात, हेच महत्त्वाचे ठरणार आहे.
