![]()
सात कोटी सदनिकाधारकांना स्वतंत्र हक्क अभिलेख देण्याची राज्य सरकारची तयारी; २६ नोव्हेंबरपासून मसुद्यावर हरकती, जानेवारीत प्रायोगिक अंमलबजावणीचे नियोजन
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। मुंबई-पुण्यासह राज्यातील बहुमजली इमारतींमध्ये फ्लॅट खरेदी करूनही स्वतःच्या सदनिकेच्या मालकीची स्वतंत्र महसुली नोंद नसल्याची अडचण आता दूर करण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊल टाकले आहे. प्रत्येक पात्र सदनिकाधारकाला स्वतंत्र ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ अर्थात सदनिकानिहाय अधिकार अभिलेख देण्याची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेनंतर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अंतर्गत २०२६ चे मसुदा नियम तयार करण्यात आले आहेत. २६ नोव्हेंबरपासून या मसुद्यावर ३० दिवस हरकती आणि सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. राज्यातील सुमारे सात कोटी सदनिकाधारकांना या व्यवस्थेचा लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, सरकारने अद्याप प्रत्येक फ्लॅटला कार्ड वाटप सुरू केलेले नाही. नियम अंतिम होणे, आवश्यक कायदेशीर बदल आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष अंमलबजावणी शक्य होणार आहे.
या प्रस्तावानुसार प्रथम संपूर्ण इमारत आणि तिच्या सामाईक जागांचा मुख्य अभिलेख तयार केला जाईल. त्यानंतर प्रत्येक सदनिकेसाठी स्वतंत्र पूरक अभिलेख आणि ओळख क्रमांक दिला जाईल. त्यात सदनिकेचा क्रमांक, धारकाचे नाव, मंजूर क्षेत्रफळ, मालकी हक्क, जमिनीतील प्रमाणशीर हिस्सा तसेच बँकेचे कर्ज, गहाण, थकबाकी आणि न्यायालयीन निर्बंध यांची नोंद असेल. नगर भूमापन क्षेत्रात इमारतीसाठी डी-१ आणि सदनिकेसाठी डी-२, तर ग्रामीण व इतर भागांत गाव नमुना ७-क आणि ७-ड या स्वरूपात नोंदी प्रस्तावित आहेत. मंजूर बांधकाम आराखडा, भोगवटा प्रमाणपत्र आणि नोंदणीकृत दस्तऐवजांच्या आधारे पात्रता तपासली जाईल. अर्ज, पडताळणी आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त कार्ड वितरणासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित केली जाणार आहे. नोंदणी व मुद्रांक विभाग, सहकार विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महारेरा यांच्यात माहितीची देवाणघेवाण करण्याचेही नियोजन आहे.
महसूल विभागाचे जमाबंदी आयुक्त शैलेश नवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२७ च्या पहिल्या आठवड्यापासून निवडक लहान जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक अंमलबजावणी सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर मोठ्या शहरांसह राज्यभर टप्प्याटप्प्याने विस्तार केला जाणार आहे. या कार्डमुळे सदनिकांची खरेदी-विक्री, बँक कर्जासाठी मालकी हक्कांची पडताळणी आणि बोज्यांची माहिती मिळविणे सुलभ होण्याची अपेक्षा आहे. मात्र, एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागेल. हे कार्ड सध्याच्या सातबारा उताऱ्याची किंवा मिळकत पत्रिकेची जागा घेणार नसून त्याला पूरक ठरणार आहे. तसेच कार्ड मिळाल्याने जमिनीचे किंवा सदनिकेचे सर्व वाद आपोआप संपतील, असेही नाही. चुकीच्या नोंदी, अपूर्ण कागदपत्रे आणि पुनर्विकासातील गुंतागुंत यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाला सक्षम यंत्रणा उभी करावी लागेल. अन्यथा स्वतंत्र कार्डाच्या नावाखाली नागरिकांना आणखी एका सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतील.
