पत्रकारांच्या फराळातून स्नेहबंध दृढ

Spread the love

Loading

पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाचा पंधरावा दिवाळी फराळ उत्साहात; महापौर रवीभाऊ लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांची उपस्थिती

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। प्रतिनिधी ।। पत्रकारितेचे काम केवळ बातम्या छापणे, प्रश्न विचारणे आणि प्रशासनाला धारेवर धरणे एवढ्यापुरते मर्यादित नसते; समाजातील विविध घटकांशी माणुसकीचे नाते जपणेही तितकेच महत्त्वाचे असते. याच भूमिकेतून पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाने गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू ठेवलेली दिवाळी फराळाची परंपरा यंदाही उत्साहात पार पडली. बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित या स्नेहमेळाव्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध माध्यमांचे पत्रकार एकत्र आले. महापालिकेचे साफसफाई कर्मचारी, शिपाई आणि सुरक्षा रक्षक अशा घटकांसोबत यापूर्वी फराळाचे आयोजन करून संघाने सामाजिक सलोख्याचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. यंदा महापौर रवीभाऊ लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सकाळी साडेदहा ते दुपारी तीन या वेळेत झालेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या स्नेहमेळाव्याला अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, संदीप खोत, ज्येष्ठ नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, शहर अभियंता मनोज सेठीया, नगर सचिव उल्हास जगताप, कार्यकारी अभियंता सुनील पवार, विजय भोजने, श्री. काशीद, लक्ष्मीकांत कोल्हे, बाळासाहेब लांडे, प्रमोद बोरसे, शशिकांत मोरे, सोहम निकम, डी. डी. पाटील, सूर्यकांत मोहिते, सहशहर अभियंता बापू गायकवाड, विनय ओव्हाळ, अनिल भालसाखळे, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर, संध्या वाघ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, लेखापाल सत्यवान उबाळे आणि मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले उपस्थित होते. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली. मात्र, अशा स्नेहमेळाव्यांचे खरे महत्त्व केवळ औपचारिक भेटीगाठींत नसून परस्परांतील विश्वास आणि संवाद वाढवण्यात आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्षा सायली कुलकर्णी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील उर्फ बाबू कांबळे, विनय लोंढे, रेहान सय्यद, सचिव संतोष जराड, सहसचिव मुकेश जाधव, प्रसिद्धीप्रमुख युनूस खतीब, कार्यकारिणी सदस्य जितेंद्र गवळी, अशोक लोखंडे, अमोल डंबाळे आणि शबनम सय्यद यांनी विशेष प्रयत्न केले. शहरातील विविध माध्यमांचे पत्रकारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासन आणि पत्रकार यांच्यात मतभेद असू शकतात; प्रश्नांवर संघर्षही होऊ शकतो. पण लोकशाहीतील या दोन महत्त्वाच्या घटकांमधील संवादाचे दरवाजे बंद होता कामा नयेत. दिवाळीच्या फराळातून जपलेली ही स्नेहाची परंपरा केवळ गोडधोडापुरती मर्यादित न राहता शहराच्या सार्वजनिक जीवनात सकारात्मक संवादाचे माध्यम ठरावी, हीच अपेक्षा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *