एअर इंडिया आणि इंडिगोनंतर नवे समीकरण? विमान कंपन्यांत गुंतवणुकीसाठी केंद्राकडे परवानगीची मागणी; आठ विमानतळांचे व्यवस्थापन करणाऱ्या समूहापुढे नियमांचा पेच
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। देशातील विमान वाहतूक क्षेत्रात आता अदाणी समूहाच्या प्रवेशाची चर्चा रंगू लागली आहे. विमानतळ व्यवस्थापनापुरते मर्यादित न राहता विमान कंपन्यांमध्येही आर्थिक गुंतवणूक करण्याची तयारी समूहाने सुरू केली आहे. अदाणी समूहाचे मुख्य वित्त अधिकारी जुगेशिंदर (रॉबी) सिंग यांनी २७ नोव्हेंबर रोजी मुंबईत ‘ट्रस्ट इंडिया डेट कॅपिटल मार्केट समिट’च्या पार्श्वभूमीवर बोलताना केंद्र सरकारकडे विमान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी परवानगी मागितल्याचे स्पष्ट केले. मात्र, अदाणी समूह स्वतःची स्वतंत्र विमान कंपनी तातडीने सुरू करणार असल्याचा याचा अर्थ नाही. विद्यमान विमान कंपनी, नव्याने विमानसेवा सुरू करू इच्छिणारा उद्योजक किंवा गुंतवणूक निधी यांच्या माध्यमातून या क्षेत्रात उतरण्याचा समूहाचा विचार आहे. विशेष म्हणजे, यंदा जुलैमध्ये अदाणी एंटरप्रायझेसने विमान कंपनी सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले होते. ३ नोव्हेंबरला अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनीही विमानतळावरील ग्राहकांशीच स्पर्धा करणे योग्य नसल्याचे म्हटले होते. आता रॉबी सिंग यांच्या विधानामुळे समूहाच्या भूमिकेत महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे चित्र दिसत आहे.

भारतातील विमान प्रवासाची क्षमता प्रचंड असल्याचा दावा करताना रॉबी सिंग यांनी देशात ६० कोटींपेक्षा अधिक लोक विमान प्रवास करू शकतात, असे सांगितले. सध्या दररोज सुमारे ३,२०० विमान उड्डाणे होतात; ही संख्या भविष्यात ३० हजारांपर्यंत वाढवण्याची गरज असल्याचे त्यांचे मत आहे. अदाणी समूह सध्या मुंबई, नवी मुंबई, अहमदाबाद, मंगळुरू, जयपूर, लखनऊ, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम या आठ विमानतळांचे व्यवस्थापन करतो. या विमानतळांवरून देशातील सुमारे २३ टक्के हवाई प्रवासी वाहतूक हाताळली जाते. दुसरीकडे, देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठेतील सुमारे ९० टक्के हिस्सा टाटा समूहाच्या एअर इंडिया आणि इंडिगो या दोन कंपन्यांकडे आहे. त्यामुळे नव्या गुंतवणूकदारांच्या प्रवेशातून स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.
मात्र, अदाणी समूहाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेसमोर नियमांचा मोठा अडसर आहे. मुंबई आणि दिल्ली विमानतळांच्या सवलत करारांमध्ये विमान कंपन्या आणि त्यांच्या संबंधित संस्थांच्या हिस्सेदारीवर १० टक्क्यांची मर्यादा आहे. या करारांमुळे विमानतळ चालवणाऱ्या समूहांना विमान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना अडचणी निर्माण होतात. विमानतळाचा मालकच विमान कंपनीचा भागीदार झाल्यास प्रतिस्पर्धी कंपन्यांना स्लॉट, पार्किंग, सुविधा आणि सेवांमध्ये समान वागणूक मिळेल का, हा गंभीर प्रश्न आहे. इंडिगोचे व्यवस्थापकीय संचालक राहुल भाटिया यांनी यापूर्वी अशा व्यवस्थेमुळे हितसंबंधांचा संघर्ष निर्माण होण्याची चिंता व्यक्त केली होती. नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनीही या विषयावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले होते. सरकारची परवानगी आणि आवश्यक करारात्मक बदल झाल्याशिवाय अदाणी समूहाला प्रत्यक्ष गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होणार नाही. त्यामुळे भारतीय आकाशात अदाणींचे विमान दिसणार की केवळ त्यांच्या भांडवलाची गुंतवणूक होणार, याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे.