पालिका शाळेत लवकरच सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम !

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – दि. १० ऑक्टो . -पालिका शाळांमध्ये लवकरच सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या पालिकेच्या या महत्वाकांक्षी उपक्रमात अंधेरी पूर्वच्या पूनमनगर शाळेत आज नवनिर्वाचित शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले.

पालिकेने यावर्षीपासून पहिल्यांदाच सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळांच्या प्रवेशप्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या शाळा अद्याप सुरू झाल्या नाहीत. मात्र काही दिवसांतच कोरोना नियंत्रणात आल्यानंतर तातडीने शाळा सुरू होतील. त्यामुळे पूनमनगर शाळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी शिक्षण सह आयुक्त आशुतोष सलील, शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्यासह अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक सहभागी झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेऊन हा कार्यक्रम पार पडला. पालिका शाळेत महागड्या खासगी शाळाप्रमाणे सीबीएसई बोर्डाचे दर्जेदार शिक्षण मोफत मिळणार असल्यामुळे पालक-विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *