महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ७ नोव्हेंबर -पुणे – ‘व्हॉटस्अॅप’ने देशात पेमेंट सेवा सुरू केली आहे. कंपनीने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली. ‘नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने गुरुवारी सायंकाळी ‘यूपीआय’ आधारित पेमेंट सेवा सुरू करायला मंजुरी दिली आहे.
फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी एक व्हिडीओ जारी केला असून, त्यात व्हॉटस्अॅपची ही सेवा 10 प्रादेशिक भाषांतून उपलब्ध असेल, असे म्हटले आहे. व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून पेमेंटपोटी कुठलीही शुल्क आकारणी करण्यात येणार नाही, असेही झुकेरबर्ग यांनी स्पष्ट केले आहे. व्हॉटस्अॅपचे भारतात 40 कोटींहून अधिक यूझर्स आहेत. दोन वर्षांपासून हे अॅप मंजुरीच्या प्रतीक्षेत होते. दहा लाख यूझर्सच्या माध्यमातून सेवेची चाचणीही सुरू होती. सुरुवातीच्या टप्प्यात 2 कोटी यूझर्सना ही सेवा मिळणार आहे.
140 हून अधिक बँकांच्या माध्यमातून ग्राहक पेमेंट करू शकतील. झुकेरबर्ग यांच्यामते हे पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यासाठी यूपीआयमान्य डेबिट कार्डची आवश्यकता असेल. सध्या या सेवेसाठी आयसीआयसीआय, एचडीएफसी, अॅक्सिस, स्टेट बँक आणि जियो पेमेंटस् बँकेसोबत टायअप करण्यात आलेले आहे.