महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १७ नोव्हेंबर – पंढरपूर – लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या परमात्मा पांडुरंग आणि रुक्मिणी मातेच्या मुखदर्शनास आजपासून सुरवात झाली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दिवाळी पाडवा, भाऊबीज या सणाचे औचित्य साधत फुलांची आकर्षक सजावट केली. या फुलांच्या सजावटीत देवाचे लोभस रूप भाविकांनी डोळ्यात साठवले. मंदिर समितीने आरोग्याची काळजी घेत दर्शन व्यवस्था चांगली ठेवली आणि देवाच्या विठुरायाच्या दर्शनाने एक सात्विक उर्जा प्राप्त झाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केल्या.
राज्य सरकारने मंदिरे दर्शनासाठी खुली करण्याच्या निर्णयाची अमलबजावणी आज झाली. १७ मार्च रोजी श्री विठ्ठल मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी बंद ठेवले होते. त्या नंतर माघी, चैत्री आणि आषाढी वारी भाविकाविना साजरी करण्यात आली. मात्र गेल्या महिन्यात कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागल्यावर मंदिरे सुरु करा अशा मागणीने जोर धरला होता. या पार्श्वभूमीवर काही निर्बंध घालत मंदिरे दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय घेतला. या बाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने बैठक घेवून दर्शनाची व्यवस्था, नियोजन करण्यात आले. दररोज भाविकांना सकाळी ६ ते रात्री ९ वाजे पर्यंत दर्शन देण्यात येणार आहे. श्री विठ्ठलाचे आणि रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन घेतले जाते. मात्र या वर निर्बंध आणीत आता केवळ मुख दर्शन करता येणार आहे.
तसेच दर्शनासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरून दर्शनाची तारीख वेळ निश्चित करावी लागणार आहे. आणि ज्या भाविकांनी संकेतस्थळवरून दर्शनाची वेळ घेतली आहे. त्याच भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. तसेच भाविकांनी ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. श्री विठ्ठल रुक्मिनिमातेचे दर्शन सकाळी ६ ते ७, ८ ते ९, १० ते ११, ११ ते १२, दुपारी १२ ते १, २ ते ३, ३ ते ४, संध्यकाळी ५ ते ६, ७ ते ८ आणि ८ ते ९ या कालावधीत भाविकांना दर्शन घेता येईल अशी माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. मास्क, योग्य अंतर, सॅनिटायझरचा वापर आदी शासनाच्या सूचनेचे पालन करावे लागणार आहे. तसेच ६५ वर्षा पुढील, १० वर्षाखाली आणि गर्भवती महिलांना दर्शनासाठी परवानगी नाही.