दिवाळी नंतर आता राज्यासाठी पुढचे १५ दिवस काळजीचे

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २२ नोव्हेंबर -दिवाळीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार अशी शक्यता व्यक्त होत असतानाच दिवाळीत कोरोना ब-यापैकी नियंत्रणात राहिला होता. मात्र दिवाळीनंतर कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा मोठी वाढ पुणे-मुंबईसारख्या शहरात होऊ लागली आहे. तर आता थंडी, दिवाळी सेलिब्रेशन आणि परराज्यातून लोकांचे महाराष्ट्रात परतणे हे महागात पडण्याची शक्यता आहे. त्यात लोकांची बेफिकिरी वाढली असून चाचणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. तेव्हा आजपासून पुढचा १५ दिवसांचा काळ राज्यासाठी महत्वाचा, धाकधूक वाढवणारा असल्याचा इशारा राज्याच्या कोव्हिड टास्क फोर्समधील सदस्यांनी दिला आहे. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणांनी ‘ट्रेसिंग-टेस्टिंग-ट्रिटमेंट’ या त्रिसूत्रीवर पुन्हा भर द्यावा, अशी सूचना करतानाच नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही केले आहे.

राज्यात कोरोना नियंत्रणात आला होता. पण आता चार-पाच दिवसापासून पुन्हा चिंता वाढण्यास सुरूवात झाली आहे. कारण राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. मुळात मागील 15 दिवसांत राज्यात ट्रेसिंग-टेस्टिंग कमी झाल्याने रुग्णांची संख्या कमी झाली होती. पण आता मात्र ट्रेसिंग-टेस्टिंग वाढवण्याची गरज आहे. विविध कारणांनी आता कोरोना रुग्ण वाढत आहेत पुढचे 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, असा इशारा राज्याच्या कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी दिला आहे.

काळजी वाढली आहे, मात्र त्याचवेळी आपली यंत्रणा येणा-या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. राज्यात आपण मोठ्या प्रमाणावर बेडस् आणि मनुष्यबळ वाढवले असून त्यात कोणतीही घट करण्यात आलेली नाही. तर आता कोरोना उपचाराचा ब-यापैकी अनुभव आपल्या डॉक्टरांना आला आहे. त्याचवेळी नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, ज्येष्ठ नागरिक, मधुमेह-उच्च रक्तदाबासारखे आजार असणा-यांनी-लहान मुलांनी घरातच रहावे आणि सर्व नियम पाळावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *