महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २६ नोव्हेंबर – जागतिक स्तरावरील सर्वात महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या अर्जेन्टिनाच्या दिएगो माराडोना यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 1986 मध्ये अर्जेन्टिनाला फुटबॉल विश्वचषक जिंकून दिला, हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा माईलस्टोन ठरला. 1986 मधील स्पर्धेतच इंग्लंडविरुद्ध लढतीत त्यांनी केलेला ‘हँड ऑफ गॉड’ गोल तब्बल 4 दशके सातत्याने चर्चेत राहिला आहे.
अर्जेन्टिनाचा माजी आक्रमक मिडफिल्डर व मॅनेजर म्हणून माराडोनानी जी लोकप्रियता मिळवली, त्याला तोड नाही. आपल्या क्लब कारकिर्दीत माराडोना यांनी बार्सिलोना व नापोली या संघांचे प्रतिनिधीत्व केले. शिवाय, इटालियन संघातर्फे 2 सिरी ए जेतेपदेही संपादन केली. माराडोना यांनी अर्जेन्टिनातर्फे 91 सामने खेळत त्यात 34 गोल केले. शिवाय, 4 विश्वचषक स्पर्धांही खेळल्या.
1990 मधील विश्वचषक फायनलमध्ये पश्चिम जर्मनीकडून पराभव स्वीकारावा लागला, त्यावेळी माराडोनाकडेच अर्जेन्टिनाच्या नेतृत्वाची धुरा होती. 1994 विश्वचषक स्पर्धेत ते अमेरिकेत पुन्हा एकदा कर्णधारपदी होते. मात्र, त्यावेळी इफेड्राईन या उत्तेजकाचे सेवन केल्याचे आढळून आल्याने त्यांना मायदेशी धाडले गेले होते.
आपल्या कारकिर्दीच्या दुसऱया टप्प्यात माराडोना कोकेनच्या व्यसनामुळे सातत्याने झगडत राहिले आणि 1991 मध्ये पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर 15 महिन्यांची बंदी लादली गेली. 1997 मध्ये माराडोना व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्त झाले. आपल्या 37 व्या वाढदिनीच त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यावेळी ते क्लब स्तरावर अर्जेन्टिनाच्या बोका ज्युनियर्स संघातर्फे खेळत होते.
आपल्या कारकिर्दीतील क्लब फुटबॉल त्यांनी इटलीत खेळले. चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा पाठीशी असताना त्यांनी 1987 व 1990 मध्ये लीग विजेतेपदे तर 1989 मध्ये युफा चषक जिंकून देत सुवर्ण झळाळीचा प्रत्यय आणून दिला होता.
बालपण गरिबीत गेले, पण, साऱयावर मात केली
8 मुलांमध्ये 5 वे असलेल्या माराडोना यांचे बालपण गरिबीत गेले. ब्यूनॉस आयर्सच्या बाहेरील भागात अगदी चिखलात त्यांनी फुटबॉल खेळले आणि यात दैवी गती लाभत गेल्यानंतर त्यांनी अवघ्या जागतिक विश्वाला आपल्या खेळाच्या मोहात पाडले. 2001 मध्ये फिफाने माराडोना यांना पेले यांच्यासह फुटबॉल इतिहासातील दोन महानतम खेळाडू म्हणून सन्मानित केले. माराडोनाच आम्हाला प्रेरणा द्यायचे, असे अर्जेन्टिना स्ट्रायकर कार्लोस तेवेझने एकदा म्हटले होते.
दृष्टिक्षेपात माराडोना यांची कारकीर्द
1977 : अर्जेन्टिना वि. हंगेरी लढतीतून पदार्पण
1982 : बार्सिलोनानंतर नापोली संघात दाखल
1986 : अर्जेन्टिनाला विश्वचषक जिंकून दिला
1990 : विश्वचषक स्पर्धेत अर्जेन्टिना उपविजेते
1991 : उत्तेजक सेवनात दोषी, 15 महिन्यांची बंदी
1994 : चौथ्या वर्ल्डकपमधून उत्तेजक सेवनामुळे बाहेर
1997 : पुन्हा उत्तेजक सेवनात दोषी, निवृत्तीची घोषणा
2010 : अर्जेन्टिना मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा
माराडोना डावखुरे, खेळ मात्र फुटबॉल विश्वात ‘उजवा’
साहसी, वेगवान व तितक्याच अंदाज देऊ न शकणाऱया खेळामुळे माराडोना अर्थातच, चाहत्यांच्या गळय़ातील ताईत होते. मास्टर ऑफ ऍटॅक म्हणून त्यांची ओळख जनमानसात रुजली. माराडोना हे डावखुरे. पण, दोन्ही पायांनी तितक्याच चपळतेने खेळणाऱया या महान खेळाडूने आपल्या असंख्य प्रतिस्पर्ध्यांना लीलया चकवा दिला, त्याला तोड नाही. माराडोना हे स्वतः डावखुरे असले तरी त्यांचा खेळ मात्र सातत्याने सर्व प्रतिस्पर्ध्यांपेक्षा ‘उजवा’च ठरला.
10 क्रमांकाची जर्सी हीच माराडोनाची खास ओळख
एक काळ असाही राहिला, ज्यात अर्जेन्टिना संघाचा पूर्ण खेळ माराडोना यांच्याभोवतीच केंद्रित राहिला. माराडोना यांना सूर सापडला तर त्यांना रोखणे निव्वळ कठीण, याची अवघ्या फुटबॉल विश्वाला पुरेपूर कल्पना होती. साहजिकच, 10 व्या क्रमाकांची जर्सी परिधान करुन माराडोना मैदानावर उतरायचे, तो क्षण डोळय़ात साठवून ठेवण्यासाठी फुटबॉल चाहते अक्षरशः वेडे होत असत.
अखेरच्या श्वासापर्यंत व श्वासानंतरही ते गोल्डन बॉयच राहिले
अर्जेन्टिनासाठी व अवघ्या फुटबॉल विश्वासाठी माराडोना ‘पिबे दे ओरो’ अर्थात गोल्डन बॉय ठरले. स्वतः माराडोना यांच्या 2 दशकातील कारकिर्दीत देखील हाच त्यांच्यासाठी सुवर्णक्षण ठरल्याचे स्पष्ट झाले. उत्तेजक, कोकेनचे व्यसन त्यांच्या कारकिर्दीला ग्रहण लावणारे ठरले. पण, तरीही त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख कधीही खाली घसरला नाही. अखेरच्या श्वासापर्यंत ते गोल्डन बॉयच राहिले.
1986 मधील ‘हँड ऑफ गॉड’ गोल
1986 फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडविरुद्ध खेळताना माराडोना यांच्या हाताला स्पर्शून चेंडू गोलजाळय़ात गेला आणि हाच क्षण सामन्याला कलाटणी देणारा ठरला.
अर्जेन्टिनात तीन दिवसांचा दुःखवटा, फुटबॉल विश्वावर शोककळा
अर्जेन्टिनाचा व अगदी जागतिक स्तरावरील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या दिएगो माराडोनाच्या निधनाने अर्जेन्टिनासह अवघ्या फुटबॉल विश्वावर शोककळा पसरली आहे. अर्जेन्टिना अध्यक्षांच्या कार्यालयाने तीन दिवसांचा राष्ट्रीय दुःखवटा जाहीर केला तर अर्जेन्टिना सॉकर संघटनेने ट्वीटरवरुन माराडोना यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.
उंची अवघी 5 फूट 5 इंच. पण, तरीही ते पुरुन उरले!
अवघ्या 5 फुट 5 इंच उंचीच्या माराडोनानी कमी उंचीचा देखील आपल्या कारकिर्दीत पुरेपूर लाभ घेतला. चेंडू सफाईने हाताळत प्रतिस्पर्ध्यांना चकवा देण्यात आणि गोलजाळय़ावर आक्रमण करण्यात त्यांचा हात कोणीही धरु शकणार नाही, इतका त्यांचा लौकिक राहिला. आपल्या कारकिर्दीच्या दुसऱया टप्प्यात बलुनिंग वेस्टलाईनमुळे माराडोना यांचा वेग जरुर कमी झाला. पण, त्यांच्या खेळातील नजाकत मात्र कधीच कमी झाली नाही.
सॅल्वातोर म्हणाले होते, माराडोना पायाने नव्हे तर मेंदूने खेळायचे!
माराडोना यांचा खेळ निव्वळ स्वप्नवत असतो. खरं सांगायचे तर ते पायाने नव्हे तर अक्षरशः युक्तीने अर्थात मेंदून खेळायचे, हे उद्गार आहेत सॅल्वातोर बॅग्नी यांचे. बॅग्नी यांनी इटालियन क्लब नापोलीत माराडोना यांच्यासमवेत काही काळ व्यतित केला. त्यावेळी त्यांनी माराडोना यांना जवळून अनुभवले होते.