महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २८ नोव्हेंबर -मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण झाली. या दहशतवाद्यांपैकी अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आले होते. हातात काहीही शस्त्र नसूनही शहीद तुकाराम ओंबळे यांनी मिठीत घट्ट पकडून ठेवले होते. कसाब हा पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी मोठा पुरावा म्हणून भारताच्या हाती लागला होता. टाटा ग्रुपच्या ताज हॉटेलवरही मोठा हल्ला झाला होता. यावर रतन टाटा यांनी भावूक पोस्ट केली आहे.
मुंबईवर हल्ला होताच मुंबई पोलिसांनी एकेका दहशतवाद्याला शोधून ठार केले होते. टाटा यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर लिहिले की, ज्या ज्या लोकांनी शत्रूवर विजय मिळविण्यासाठी मदत केली, त्यांचे बलिदान आम्ही नेहमी आठवणींत ठेवू. तसेच त्यांनी मुंबईकरांच्या धैर्याचेही कौतूक केले आहे. या एकतेला सांभाळून ठेवण्याची जबाबदारी असल्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
आजपासून 12 वर्षांपूर्वी जो विनाश झाला, तो कधीही विसरता येणार नाही. मात्र, त्यापेक्षाही लक्षात राहाणारे आहेत ते त्या दिवशी दहशतवाद संपविण्यासाठी सर्व मतभेद विसरून एकत्र आलेले मुंबईचे लोक. आम्ही ज्यांना गमावले, ज्यांनी शत्रूवर विजय मिळविण्यासाठी बलिदान दिले, आज आम्ही जरूर त्यांच्यासाठी दु:ख करू शकतो. मात्र, आम्हाला त्या एकतेला, दयाळुपणाला आणि संवेदनशीलतेलाही मानायला हवे. तसेच ती कायम ठेवायला हवी. मला वाटते की पुढील संकटांत ती आणखी वाढेल, असे टाटा म्हणाले.