महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३० नोव्हेंबर शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागेवरील प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीत तुमच्या पाल्याचे नाव लागले असेल आणि अद्याप प्रवेश मिळाला नसेल तर तुम्हाला आणखी एक संधी मिळणार आहे. आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागा शिल्लक असतील, त्या शाळांमध्ये प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकणार आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने प्रयत्न सुरू केले असून लवकरच त्याबाबतची प्रवेश प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे.

आर्थिकदृष्टया दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यंदा प्रक्रियेतील पहिली सोडत मार्चमध्ये काढण्यात आली. त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर झाला. या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. पहिल्या सोडतीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यावर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. या प्रक्रियेनंतरही अजूनही जागा रिक्त आहेत. त्यामुळे रिक्त जागांवर प्रतिक्षा यादीतील पण अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. आता याच प्रक्रियेत आणखी एक संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जाणार आहे. प्रतिक्षा यादीत नाव असतानाही अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळांमधील रिक्त जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेऊन प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांनी दिली आहे. त्यानुसार प्रतीक्षा यादीतील प्रवेशाचा पुढील टप्पा लवकरच जाहीर होणार आहे.