भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत कांगारूंचा दुसऱ्या सामन्यासह मालिका विजय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३० नोव्हेंबर – सलग दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर ५१ धावांनी मात करुन ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय संघ सिडनीच्या मैदानावर ३९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ३३८ धावांपर्यंतच मजल मारु शकला. भारताकडून विराट कोहली, लोकेश राहुल आणि अन्य फलंदाजांनी चांगले प्रयत्न केले. परंतू टीम इंडियाला अपेक्षित धावगती कायम न राखल्यामुळे ३९० धावांचे डोंगराएवढे आव्हान पार करता आले नाही.

शिखर धवन आणि मयांक अग्रवाल जोडीने भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली. परंतू अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर महत्वपूर्ण भागीदारी करत कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी सुरुवातीला मैदानावर स्थिरावण्याला प्राधान्य दिला. परंतू यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दोघांना फारसे मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. हेन्रिकेजने श्रेयस अय्यरला बाद करत भारताची जोडी फोडली, श्रयसने ३८ धावा केल्या. यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांची जोडी जमली. यादरम्यान विराटने आपले अर्धशतकही पूर्ण केले.

दुसऱ्या बाजूने त्याला लोकेश राहुलही चांगली साथ देत होता. मैदानावर ही जोडी कमाल दाखवणार असे वाटत असतानाच विराटला हेजलवूडने माघारी धाडले, ८९ धावांची त्याने खेळी केली. कोहली बाद झाल्यानंतर लोकेश राहुलनेही जबाबदारी स्विकारत पांड्याच्या जोडीने फटकेबाजीचा प्रयत्न केला. अर्धशतकी खेळी केल्यानंतर तो देखील झॅम्पाच्या गोलंदाजीवर ७६ धावा काढून बाद झाला. यानंतर पॅट कमिन्सने एकाच षटकात जाडेजा आणि पांड्याला बाद करत भारताच्या आक्रमणातील हवाच काढली. यानंतर भारताच्या अखेरच्या फळीतील फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने ३, जोश हेजलवूड आणि झॅम्पाने प्रत्येकी २ तर हेन्रिकेज आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *