महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३० नोव्हेंबर – सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष प्रवेश प्रक्रियेकडे लागले आहे. निकालानंतर प्रवेश प्रक्रिया डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता सीईटी अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. यंदा सीईटी परीक्षेला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद लाभल्याने यंदाही अभियांत्रिकी महाविद्यालयातील जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
50 टक्के उपस्थितीची अट रद्द करा; शिक्षकांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
यंदा अभियांत्रिकी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला नाही. यातच यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीईटीचा निकाल उशिरा जाहीर झाला. परीक्षेला प्रतिसाद कमी लाभला असल्याने यंदाही अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. गतवर्षी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांतील तब्बल 72 हजार 600 जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा तरी कोरोना, उशिरा सीईटी आणि प्रवेशाला अद्याप प्रारंभ नाही यामुळे प्रवेशाला प्रतिसाद मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सीईटीला अर्ज भरूनही दीड लाख विद्यार्थी परीक्षेला बसले नाहीत. त्यामुळे प्रवेशासाठी किती विद्यार्थी प्रतिसाद देतील आणि अभ्यासक्रम कसा असेल, पुढील परीक्षा कधी होतील आदी माहिती अगोदर सीईटी सेलला विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. यामुळे यंदा जागा भरण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अगोदरच प्रवेशासाठी अवधी कमी मिळणार आहे.
विद्यार्थ्यांअभावी महाविद्यालयेच ओस
सीईटी देऊनही अनेक विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याने अभियांत्रिकी व व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांअभावी महाविद्यालयेच ओस पडत आहेत. गेल्या वर्षीच प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांसाठी 1 लाख 44 हजार जागा होत्या. त्यापैकी 71 हजार 350 जागांवर प्रवेश पूर्ण झाले, तर 72 हजार 659 जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे विद्यार्थीच फिरकत नाहीत, असे चित्र असतानाही खासगी संस्थाचालकांवर एआयसीटीईच्या कृपादृष्टीमुळे जागा वाढतात आणि त्यामुळे रिक्त राहणाऱ्या जागांची संख्या दर वर्षी वाढते.