युद्ध आखातात… अफवांचं पीक मराठवाड्यात! पेट्रोल टंचाईच्या चर्चेनं पंपांवर लांबच लांब रांगा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०४ मार्च २०२६ ।। आखाती देशांतील इराण–इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात अफवांचं अक्षरशः पीक आलं आणि त्याचे पडसाद थेट पेट्रोलपंपांवर उमटले. नांदेड, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सायंकाळच्या सुमारास अचानक वाहनांची गर्दी उसळली. एरव्ही शंभर-दोनशे रुपयांचं पेट्रोल भरणारे दुचाकीस्वार “टाकी फुल करा” असा आग्रह धरताना दिसले; कारचालकांनीही तीच घाई केली. कारण एकच—इराण–इस्रायल युद्धामुळे भारतात पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण होणार आणि दर गगनाला भिडणार, अशी सोशल मीडियावर पसरलेली अफवा.

Nanded येथे दुपारपर्यंत परिस्थिती सुरळीत होती; मात्र सायंकाळी पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या. काही पंप धुळवडीमुळे सकाळपासून बंद होते, तर जे सुरू होते त्याठिकाणी एकच झुंबड उडाली. पेट्रोल मिळणार नाही या भीतीनं अनेकांनी टँक फुल केले. आखाती तणावामुळे दर अडीचशे रुपयांवर जाणार, असा संदेश व्हायरल होताच लोकांनी घाईगडबडीत इंधन भरून घेतले. मात्र पंपचालकांनी “साठा मुबलक आहे, घाबरू नका” असे स्पष्ट केले.

या गोंधळात सोशल मीडियावरील तथाकथित ‘रिल्सबाजां’नी अधिक भर घातल्याची चर्चा आहे. व्ह्यूज आणि लाईक्सच्या हव्यासापोटी पेट्रोल-डिझेल टंचाईचे दावे करणारे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. शेवटी Petrol Pump Dealers Association ला पुढे येत नागरिकांना आवाहन करावे लागले की, राज्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तज्ज्ञांच्या मते, युद्धकाळात अफवा वेगाने पसरतात आणि घबराट निर्माण करतात. त्यामुळे सोशल मीडियावरील अपुष्ट माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत स्रोतांकडूनच खात्री करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *