महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३ डिसेंबर – रक्ताचा काळाबाजार करणाऱया राज्यातील ब्लड बँकांना राज्य सरकारने चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. रक्ताचा साठा उपलब्ध असतानाही रुग्णाला रक्त देण्यास नकार देणाऱया ब्लड बँकांवर दंड आकारण्यात येणार आहे.
रक्तसाठय़ाची माहिती लपवल्यास दररोज एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. सरकारच्या सूचनांचे वारंवार उल्लंघन केल्याचे आढळल्यास रक्तपेढय़ांचा परवाना रद्द होईल.
राज्यात रक्तपेढय़ांकडून वेगवेगळ्या प्रकारचे गैरप्रकार होत असल्याच्या मोठय़ा प्रमाणावर राज्य सरकारकडे तक्रारी आल्या आहेत. राज्य रक्त संक्रमण परिषदेची बैठक झाली. गैरप्रकार करणाऱया रक्तपेढय़ांवर कारवाई करण्याची शिफारस या बैठकीत करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आज शासन निर्णय जाहीर केला आहे.