आज भारत बंद दरम्यान काय सुरू, काय बंद राहणार?

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ८ डिसेंबर – गेल्या 12 दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. हे कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठीच शेतकऱ्याकडून 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ची घोषणा करण्यात आलीय.आतापर्यंत शेतकऱ्यांचं ज्या संख्येनं आंदोलनात सहभाग दिसला आहे, ते पाहता ‘भारत बंद’ही परिणामकारक असण्याची शक्यता वर्तवली जातेय.

या बंद दरम्यान काय सुरू राहील आणि काय बंद राहील, हे पाहण्याआधी आपण या बंदला नेमका कुणी कुणी पाठिंबा दिलाय, हे पाहू.

दिल्लीत येणारे रस्ते आणि सीमा आधीच बंद .गेल्या 12 दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी दिल्लीच्या विविध सीमांवर आंदोलन करत आहेत. दिल्लीला येणारे अनेक रस्ते बंद आहेत.दिल्ली-हरियाणा सीमेवर सिंधु, टिकरी, झरौदा, औचंदी, लामपुर, मानीयारी आणि मंगेश परिसरातील सीमा सील करण्यात आल्या आहेत.

टोलनाक्यांवर वाहनांना अडवण्यात येणार
शेतकऱ्यांनी ‘भारत बंद’ च्या दिवशी दिल्लीला जाणारे सर्व रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतलाय.सर्व टोलनाक्यांवर वाहनांना अडवण्यात येईल आणि निदर्शनं होतील.

दूध, भाज्या, फळांचा पुरवठाही बंद
शेतकरी आंदोलनांच्या नेत्यांमधील प्रमुख नेते असलेले योगेंद्र यादव यांनी केलेल्या ट्वीटनुसार दूध, भाज्या आणि फळांचा पुरवठाही बंद केला जाईल. त्यांच्या या वक्तव्यावर काहीजणांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरणही दिले.

“दूध आणि भाज्या यांचाही भारत बंदमध्ये समावेश केल्यानं अनेकांनी वाद घातल्याचे पाहून मला आश्चर्य वाटलं. भविष्यावर परिणाम करणाऱ्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील एक दिवसाचं उत्पादन (भाज्या, फळं दूध इत्यादी) विकले नाहीत, तर चूक काय?” असा सवाल योगेंद्र यादव यांनी उपस्थित केला आहे.

त्यामुळे दूध, भाज्या इत्यादी गोष्टींचाही पुरवठा खोलंबण्याची शक्यता वर्तवली जातेय. विशेषत: दिल्लीत याचे परिणाम इतर राज्यांच्या तुलनेत अधिक दिसण्याची शक्यता आहे.

रस्ते बंद असल्यानं वाहतुकीवर परिणाम?
भारत बंदमध्ये प्रामुख्याने रस्ते बंद केले जाणार असल्यानं अर्थातच वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर आता हळूहळू कारखाने, कंपन्या सुरू होऊ लागल्या आहेत. अशावेळी वाहतुकीवर परिणाम झाल्यास या कारखान्यांनाही फटका बसू शकतो. अर्थात, हे भारत बंद केवळ एक दिवसासाठीच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *