कोरोना चाचणी आता परवडेल अशा दरात ; रुग्णवाढीचा दरही घसरून 0.21 वर; आरोग्यमंत्री राजेश टोपे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १६ डिसेंबर – खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचणी आता केवळ ७८० रुपयांमध्ये होईल. राज्य शासनाने ९८० रुपयांवरून हा दर आणखी २०० रुपये घटवला असून दरामध्ये कपात करण्याची ही सहावी वेळ आहे. विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

राज्यात कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही दिलासादायक बाब आहे. मात्र, अजूनही नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. राज्याचा रुग्णवाढीचा दर ०.२१ इतका असून. केंद्राच्या पोर्टलवर हा दर अधिक असलेल्या १४ राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात कोरोना चाचण्यांचे दर सातत्याने कमी केले जात असून केंद्र शासनाने निश्चित केलेल्या ४५०० रुपयांवरून आता खासगी प्रयोगशाळेत ७८० रुपयांमध्ये कोरोना चाचण्या होणार आहेत. राज्य शासनाने कोरोना उपाययोजनांसंदर्भात निर्णय घेताना सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून निर्णय घेतले, असे टोपे म्हणाले.

रिक्त पदांच्या भरतीला लवकरच चालना

राज्यात आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीला चालना मिळाली असून त्याची प्रक्रिया लवकरच सुरू होत असून राज्यात कोरोना लसीकरणाचीही तयारी सुरू आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. मतदानाच्या प्रक्रियेप्रमाणे बूथ करून लसीकरण करण्यात येणार आहे, असे टोपे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *