महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २२ डिसेंबर -ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर केंद्राच्या हालचाली सुरू झाल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते आ. हरिभाऊ बागडे व खासदार डॉ. भागवत कराड यांनी राळेगणसिद्धीत हजारे यांची भेट घेतली. उपोषणाचा निर्णय घेऊ नये, अशी विनंती त्यांनी केली. अण्णा म्हणाले, ४५ वर्षे मंदिरात राहणाऱ्या एका फकिराला दिलेले वचन सरकारला पाळता येत नसेल, तर सामान्य जनतेचे काय? वचन न पाळणाऱ्या सरकारच्या राज्यात जगण्याची इच्छा राहिली नाही. तुम्ही केलेल्या मागण्या शेतकरी हिताच्या असून चर्चेतून मार्ग काढू. वय पाहता आता उपोषणाचा मार्ग अवलंबू नये, असा आग्रह भाजप नेत्यांनी केला.
जीवनातले शेवटचे उपोषण
अण्णा म्हणाले, केंद्रीय कृषी मूल्य आयोगास स्वायत्त दर्जा व स्वामिनाथन आयोग शिफारशींनुसार शेतीमालाला हमीभाव देण्याचे आश्वासन केंद्राने दोनदा दिले. मात्र ते पाळले नाही. आता जीवनातील शेवटचे उपोषण करायचे ठरवले आहे. त्यासाठी रामलीला मैदानाची परवानगी मागितली आहे.