महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २३ डिसेंबर – शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी गुरुवार (ता. २४) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत प्रतीक्षा यादीतील जवळपास ४५ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ही मुदतवाढ दिली आहे.
राज्यातील नऊ हजार ३३१ शाळांमधील एक लाख १५ हजार ४७७ रिक्त जागांवरील प्रवेशासाठी ही प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत नियमित प्रवेश फेरीत ६८ हजार २१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आली. प्रतीक्षा यादीत निवड झालेल्या ३६ हजार ४५६ विद्यार्थ्यांपैकी ४५ टक्के म्हणजेच १६ हजार ४५६ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला आहे.
प्रतीक्षा यादीतील ५५ टक्के विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतला नाही. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी मिळावी म्हणून प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ही मुदतवाढ दिली आहे.
पालकांसाठी सूचना
शिल्लक राहिलेल्या जागांनुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाची तारीख कळविली जाईल.
पालकांनी फक्त एसएमएसवर अवलंबून राहू नये. आरटीई पोर्टलवर अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याची तारीख पाहावी.
प्रवेशासाठी पालकांनी गर्दी करू नये, तसेच प्रवेश घेण्यासाठी सोबत बालकांना घेऊन जाऊ नये.
प्रवेशाकरिता लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती घेऊन जावे.