महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २४ डिसेंबर – युनायटेड किंगडम अर्थात यूकेमध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणूचा नवा अवतार हा अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे आपल्यालाही आता जास्त काळजी घ्यावी लागेल, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय. कोरोना विषाणूचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य असला तरी आपण सध्या देत असलेली औषधं आणि निर्माण होत असलेल्या कोरोना लस या त्या विषाणूवर परिणामकारक असल्याचा दावाही आरोग्यमंत्री टोपे यांनी केलाय.
या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आपण ब्रिटन, मिडल ईस्ट, युरोपीय देशातून येणा-या प्रवाशांना विलगीकरण बंधनकारक केलं आहे. कोरोनाबाबत सरकारने घालून दिलेले नियम पाळणं अधिक गजरेचं आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि नाताळ, तसंच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं लावलेल्या रात्रीच्या संचारबंदीला चांगला प्रतिसाद असल्याचंही टोपे म्हणाले.
कोरोना विषाणूच्या नव्या अवताराबाबत पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमद्ये योग्य ते संशोधन करण्याचं काम सुरु आहे. याचा योग्य अभ्यास करुन ते आपला अहवान कउटफ ला सादर करणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.
लसीकरण प्रशिक्षण पूर्ण
केंद्र सरकारने दिलेल्या कार्यक्रमानुसार राज्य सरकारकडून लसीकरणाचं प्रशिक्षण पूर्ण झालं असल्याचंही आरोग्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर शीतगृहांच्या कमतरतेबाबत केंद्राला कळवण्यात आलं असून, केंद्राकडून त्याबाबत आश्वासन देण्यात आलं आहे. आपल्याला नागरिकांना दोन वेळा लस द्यावी लागणार आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत राज्य सरकारने मायक्रो प्लॅनिंग केल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी आवर्जुन सांगितलं.
सीरम, भारत बायोटेकची लस अंतिम टप्प्यात
सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठानं संयुक्त विद्यमान तयार केलेली लसीचं तिस-या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल पूर्ण झालं आहे. सीरमकडून लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मागण्यात आली आहे. त्याचबरोबर भारत बायोटेककडूनही केंद्र सरकारकडे परवानगी मागवली आहे. त्यामुळे आता चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात आहे. त्यांनी ठरवायचं आहे की कोणत्या तारखेला लसीकरणाला सुरुवात करायची, असंही राजेश टोपे माध्यमांशी बोलताना म्हणाले.