महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २६ डिसेंबर -शहरात गेल्या दोन दिवसांपासून असलेला थंडीचा कडाका थोडा कमी झाला असला, तरीही तो ‘थर्टीफर्स्ट’पर्यंत पुन्हा वाढण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. राज्यात सर्वांत कमी तापमान गोंदिया येथे ८.८ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले, तर पुण्यातील किमान तापमानाचा पारा ९.९ अंश सेल्सिअस नोंदला गेला.
शहरात गेल्या दोन दिवसांमध्ये किमान तापमानाचा पारा आठ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदला जात होता. त्यात गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत अंशतः वाढ झाली. किमान तापमानाचा पारा मंगळवारी २.७ अंश सेल्सिअसने घसरून ८.१ अंश सेल्सिअस झाला. या हिवाळ्यातील हे नीचांकी तापमान होते. त्यानंतर गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमान सरासरीपेक्षा ०.९ अंश सेल्सिअसने किमान कमी नोंदले गेले. पुढील दोन दिवसांमध्ये शहरातील किमान तापमानाचा पारा ११ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. मात्र, त्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत हे तापमान पुन्हा ९ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
हिमालयात होत असलेल्या हिमवृष्टीचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. यामुळे उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह कमी झाला असला, तरी राज्यातील अनेक भागांत थंडी अजूनही कायम आहे. बुधवारपासून पुन्हा थंडीचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा वाढून ८ अंश सेल्सिअसपर्यंत स्थिरावला आहे. दिवसभर थंड वातावरण नसले, तरी सायंकाळनंतर थंडी वाढत आहे.
प्रमुख शहरांचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) –
मुंबई (सांताक्रूझ) २०, रत्नागिरी १७.८, डहाणू १७, पुणे ९.९, जळगाव १०.३, कोल्हापूर १६.५, महाबळेश्वेर १३.४, मालेगाव ११.४, नाशिक ९.२, सांगली १४.३, सातारा १२.५, सोलापूर १३.६, औरंगाबाद १०.४, परभणी १२.२, नांदेड १२.१, अकोला १०.४, अमरावती ११.९, बुलडाणा १२.४, चंद्रपूर ११.२, गोंदिया ८.८, नागपूर ९.८, वर्धा १०.२. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत हे तापमान नोंदवले गेले आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वर्धा वगळता गोंदिया, नागपूर भागांत किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली होता. मराठवाड्यात थंडी कमी-जास्त होत आहे. तेथे किमान तापमान ८ ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातही थंडी कमी-अधिक स्वरूपात आहे. पुणे, नगर, नाशिक, जळगाव भागांत थंडी अधिक आहे, तर इतर भागांत थंडी कमी झाली आहे. कोकणात बऱ्यापैकी थंडी असल्याने किमान तापमान अजूनही १६ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.