शेतकरी आंदोलन ; आजच्या बैठकीकडे सगळ्यांच्या नजरा; तोडगा निघणार ?

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३० डिसेंबर – नव्या कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेले शेतकरी आज तरी घरी परतणार का? केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये होणाऱ्या चर्चेत तोडगा निघणार का? हे आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज होणाऱ्या बैठकीनंतर मिळणार आहे. मागील महिनाभरापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी केंद्र सरकार आज चर्चा करणार आहे. दुपारी तीन वाजता ही बैठक होत असून, सगळ्यांचं लक्ष बैठकीकडे लागलं आहे.

केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये दुपारी दोन वाजता विज्ञान भवनात बैठक होत आहे. केंद्र सरकारनं चर्चेसाठी निमंत्रित केल्यानंतर शेतकरी संघटनांनीही बैठकीतील चर्चेच्या मुद्द्यांबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. तीन कृषी कायदे रद्द करण्याची प्रक्रिया निश्चित करावी, किमान आधारभूत किमतीची हमी द्यावी, वीजदुरुस्ती विधेयकात बदल करावेत आणि खुंट जाळल्याबद्दल होणाऱ्या कारवाईतून शेतकऱ्यांना वगळावे, असे चार मुद्दे शेतकऱ्यांनी केंद्रापुढे ठेवले आहेत. या चार मुद्द्यांवर तर्कशुद्ध तोडगा काढण्यासाठी चर्चा करावी, असे पत्र ४० संघटनांच्या वतीने मंगळवारी केंद्राला पाठवलं आहे.

‘‘या बैठकीत तोडगा निघू शकतो. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच, अन्य मंत्र्यांच्या तडजोड न करण्याच्या भूमिकेमुळे चर्चेच्या फलनिष्पत्तीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. ५ डिसेंबरला झालेल्या बैठकीच्या पलीकडे जाऊन केंद्राने एक पाऊल पुढे टाकले तरी तोडगा निघेल, अन्यथा शेतकरी संघटनांना दीर्घकाळ संघर्ष करावा लागेल’’, असे मत ‘स्वराज इंडिया’चे नेते योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचा बुधवारचा ट्रॅक्टर मोर्चा पुढे ढकलण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनाचा मंगळवारी ३४ वा दिवस होता. दिल्लीच्या वेशींवरील आंदोलकांचे साखळी उपोषणही कायम आहे.

शाह-तौमर यांची झाली बैठक

शेतकऱ्यांसोबत होत असलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांसोबत होणाऱ्या चर्चेत सरकारच्या भूमिकेवर विचारमंथन करण्यात आलं. मंत्र्यांच्या बैठकीत केंद्र सरकारची भूमिका निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *