महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ४ जानेवारी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री, आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच कोरोनाचे नियम धाब्यावर बसवल्याचे चित्र सत्ताधारी पक्षातील आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या ‘शाही’ विवाह सोहळ्याप्रसंगी येथेे पाहावयास मिळाले. विशेष म्हणजे यावरून सायंकाळपासून सर्वसामान्यांमध्ये चर्चा आणि संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असतानादेखील संबंधित यंत्रणेकडून कारवाईचे कोणतेही पाऊल रात्री उशिरापर्यंत उचलले गेले नव्हते.
कोरोनास्थिती व एमटीडीसीच्या आढाव्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी नाशिक दाैऱ्यावर हाेते. गंगापूर धरण येथील बोट क्लबलगत असलेल्या एमटीडीसी रिसॉर्टमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. नंतर ते आपल्या निकटवर्तीय आमदार पुत्राच्या शाही विवाह सोहळ्यातल्या जंगी गर्दीत सहभागी झाले. सोहळ्यातील पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, आमदार सरोज अहिरे, नितीन पवार, माणिकराव कोकाटे यांच्यासह विविध पक्षांतील राजकीय पुढारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थितीही लक्ष वेधून गेली. गर्दीमुळे कोणत्याही प्रकारचे फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यात आले नाही.
दौऱ्याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नसल्याचे सांगत सद्य:स्थितीत काळजी घेणे हा एकमेव उपाय असून शासनही त्यादृष्टीने कशा प्रकारे काळजी घेत आहे ते पटवून दिले. कोरोनाकाळात शंभर ते दोनशे लोकांच्या उपस्थितीतच विवाह सोहळे पार पडत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यानंतर केवळ अर्ध्या तासाच्या अंतराने अजितदादांनी आपल्याच पक्षातील निकटवर्तीय आमदारपुत्राच्या विवाह सोहळ्यास हजेरी लावली आणि हजारोंच्या गर्दीत अजितदादांनीही स्वत:ला सामावून घेतले.