महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ७ जानेवारी – पेट्रोलचे दर (Petrol) पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीत बुधवारी पेट्रोलचा दर प्रती लिटर 83 रुपये 97 पैसे इतका होता. सलग 29 दिवस स्थिर राहिल्यानंतर आता बुधवारी पेट्रोलच्या दरात 26 पैसे वाढ झाली असून डिझेल प्रती लिटर 25 पैशांनी वाढलं आहे. दिल्लीत आज डिझेलचा दर प्रती लिटर 74.12 रुपये झाला आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळं (Corona Virus Pandemic) जगभरातील इंधनाच्या मागणीवर परिणाम झाला आहे. अनेक देशांमध्ये लसीकरण सुरू होत असल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वधारले आहेत. ब्रेंट क्रूड तेलाचा भाव प्रती बॅरल 53.86 झाला आहे. तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट 50 डॉलरच्या आसपास पोहोचला आहे.
कच्च्या तेलाच्या भावात प्रती बॅरल एक डॉलर वाढ झाली तरी आपल्या देशावर आयातीसाठीच्या खर्चात वार्षिक 10 हजार 700 कोटी रुपयांची वाढ होते. लाईव्ह मिंटच्या वृत्तानुसार, गेले काही दिवस तेल कंपन्यांनी दर स्थिर ठेवले आहेत. मात्र आता किंमती खूप वाढल्या आहेत. दिल्लीत 4 ऑक्टोबर 2018 रोजी पेट्रोलचा उच्चांकी भाव प्रती लिटर 84 रुपये होता. तर गेल्या वर्षी डिझेलचा दर प्रती लिटर 81.94 रुपये होता. देशात वाहतूक आणि इंधनाचे दर यात सातत्यानं वाढ होत आहे. यामुळं सरकारवर करांचे दर कमी करण्यासाठी दबाव येत आहे. रिफायनरी किंमती शिवाय केंद्र आणि राज्य सरकारकडून लावण्यात येणारे कर आणि डीलर्सचे कमिशन यांचा इंधनाच्या दरात समावेश असतो.
भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा तेल आयातदार देश आहे. केंद्रसरकार आता सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या भागीदारीतून तेल आयात करण्याला पर्याय शोधात आहे. यामुळे केवळ तेला आयातीचा खर्च कमी होणार नाही तर, चीनशी स्पर्धा करण्याचीही संधी मिळेल. सध्या चीन दुसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश असल्यानं चीनला आपल्या अटींनुसार तेल खरेदी करता येते. कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीचा परिणाम भारताच्या आयात खर्चावर होतो. त्यामुळं महागाई आणि व्यापारी तूटही वाढते. आर्थिक वर्ष 2019-2021 मध्ये भारतानं कच्या तेलाच्या आयातीसाठी 101.4 अब्ज डॉलर्स खर्च केला आहे. 2018-19 मध्ये हा खर्च 111.9 अब्ज डॉलर्स होता.