महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ७ जानेवारी – पुणे विभाग गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत पाच हजार 647 सदनिकांसाठी 53 हजार 472 नागरिकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. येत्या 11 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. तसेच, 22 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता नेहरू मेमोरियल हॉल येथे ऑनलाइन लॉटरी काढण्यात येणार असून, लाभार्थ्यांना बॅंकांकडून कर्ज मिळवून देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
म्हाडाच्या पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी बुधवारी (ता.६) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुख्य प्रशासकीय अधिकारी विजय ठाकूर या वेळी उपस्थित होते. माने म्हणाले, पुणे म्हाडाच्या वतीने आत्तापर्यंतची ही सर्वांत मोठी लॉटरी असून, पहिल्याच दिवशी 70 हजार नागरिकांनी नोंदणी केली होती. आजअखेर एक लाख 16 हजार 341 इच्छुक नागरिकांनी सदनिकांसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 53 हजार 472 नागरिकांचे प्रत्यक्ष ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत.
ऑनलाइन लॉटरीनंतर सदनिकांसाठी निवड झालेल्या नागरिकांच्या कागदपत्रांची छाननीसाठी म्हाडाच्या मुख्य कार्यालयासह चाकण-म्हाळुंगे आणि पिंपरी- चिंचवड येथे शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना गृहकर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी विविध राष्ट्रीयकृत आणि खासगी बॅंकांचे प्रतिनिधी शिबिरास उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान आवास योजना, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, म्हाडाकडून बांधण्यात आलेले प्रकल्प आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत या सदनिका सुमारे 30 ते 40 टक्के सवलतीच्या दरात नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.
लॉटरीनंतर तासाभरात लाभार्थ्याला एसएमएस
ऑनलाइन लॉटरीच्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवासन आणि म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर उपस्थित राहणार आहेत. लॉटरी जाहीर केल्यानंतर त्याच दिवशी एका तासात संबंधित लाभार्थ्यास मोबाईलवर मेसेज आणि ई-मेल पाठविण्यात येणार आहे. तसेच, सदनिका मिळवून देण्यासाठी कोणालाही सल्लागार किंवा एजंट म्हणून नेमलेले नाही, असे म्हाडाचे मुख्य अधिकारी माने यांनी सांगितले.