महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ९ जानेवारी – सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात २४४ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाच्या पडझडीमुळे यजमान ऑस्ट्रेलियाला ९४ धावांची आघाडी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या दुस-या डावाला सुरुवात केली. पण त्यांना सहाव्या षटकातच विल पुकोवस्कीच्या रुपाने धक्का बसला. सिराजने त्याला बाद केले. त्यानंतर १० व्या षटकात कांगारुंना आर. अश्विनने दुसरा धक्का दिला. त्याने वॉर्नरला पायचीत पकडले. ३५ धावसंख्येवर २ विकेट पडल्यानंतर मधल्या फळीतील लाबुशेन आणि स्मिथ यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीने सलग दुस-या डावात ५० हून अधिक धावांची भागिदारी पूर्ण करून संघाला मजबूत स्थितीत पोहचले. तिस-या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने २ विकेट गमावून १०३ धावा केल्या आहेत. सध्या त्यांच्याकडे १९७ धावांची भक्कम आघाडी आहे. मार्नस लाबुशेन ४७ (६९) आणि स्टीव्ह स्मिथ २९ (६३) धावांवर खेळत आहेत.
लाबुशेन-स्मिथ जोडीची अर्धशतकी भागिदारी पूर्ण
२३.४ षटकात लाबुशेनने सिराजचा चेंडू लेग साईडला फटकावला आणि तीन धावा वसूल केल्या याबरोबरच लाबुशेन आणि स्मिथ या जोडीने ५० धावांची भागिदारी पूर्ण केली. पहिल्या डावातही या दोघांनी शतकी भागिदारी करून संघाला मजबूत स्थितीत पोहचवले होते.
ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का
टीम इंडियाचा फिरकीपटू आर. अश्विनने संघाला दुसरे यश मिळवून दिले. त्याने डेव्हीड वॉर्नरचा अडसर दूर केला. मोठी धावसंख्या उभारण्यात वॉर्नरला पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. दुस-या डावात तो अवघ्या १३ धावा करू शकला. दरम्यान, पहिल्या डावात वॉर्नरला सिराजने बाद केले होते. त्यावेळीही त्याला अवघ्या ५ धावांवर माघारी परतावे लागले होते.
सिराजने पोकोवस्की माघारी धाडले
ऑस्ट्रेलियाच्या दुस-या डावाला टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सुरुंग लावला. त्याने सलामीवीर विल पुकोवस्कीला अवघ्या १० धावांवर बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. विकेटच्या मागे बदली विकेटकीपर ऋद्धिमान साहा ने पुकोवस्कीचा झेल पकडला.