महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १३ जानेवारी – पाँडेचरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून कोरोनाची लस पहिल्यांदा राजकारण्यांना देण्याची मागणी केली. त्यांनी देशातील राजकीय पक्षांचे नेते, मंत्री आणि लोकप्रतिनिधींना कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातच लस टोचण्यात यावी अशी विनंती केली आहे.
पाँडेचरीचे मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी म्हणाले, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे आणि त्यांना विनंती केली आहे की त्यांनी देशातील कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातच पक्षाचे नेते, मंत्री आणि लोकप्रतिनिधींना लस टोचण्यास परवानगी द्यावी. यामुळे लोकांसमोर एक उदाहरण सादर होईल आणि लोकांचा लसीकरणावरील विश्वास वाढेल.’
भारतात कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा हा १६ जानेवारी पासून सुरु होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिसिल्ड लसीची पहिली खेप पुण्यातून देशभरातील विविध १३ ठिकाणी पाठवण्याचे काम मंगळवारी सुरु करण्यात आले.
कोव्हिशिल्ड ही भारतात वापरास तात्काळ परवानगी मिळालेल्या दोन कोरोना लसींपैकी एक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच सांगितले आहे की कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जवळपास ३ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षावरचे नागरिक आणि ५० वर्षाच्या आतील अनेक व्याधींनी त्रस्त असलेल्या लोकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे.