महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १३ जानेवारी – एकीकडे जगातील अनेक देशांत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे मात्र अनेक देशांत महामारी विक्राळ रूप धारण करत असल्याचे दिसून येत आहे. त्यात चीनचाही समावेश हाेताे. महामारीवर नियंत्रण मिळवल्याचा दावा करणाऱ्याने चीनने मंगळवारी ५० लाख लाेकसंख्या असलेल्या लँगफेंग शहरातही कडक लाॅकडाऊन केला. चीनने अलीकडेच हेबई प्रांतातील एका माेठ्या शहरात लाॅकडाऊन केला हाेता. चीनच्या या निर्णयामुळे देशात दुसऱ्या लाटेची भीती वर्तवली जाते. लँगफेंगमधील नागरिकांना आठवडाभर क्वॉरंटाइन राहण्याची सूचना देण्यात आली आहे. लवकरच येथील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. लँगफेंगच्या सीमेमध्ये येणारे गुआन व सानहेमध्ये आधीपासूनच लाॅकडाऊन सुरू आहे. चीनमध्ये अलीकडेच सर्वाधिक बाधित आढळून येत असलेल्या प्रांतात शिझियाझुआंगचा समावेश आहे. १.१ काेटी लाेकसंख्येच्या या शहरात अतिशय कडक लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. बीजिंगच्या कॅब शेअरिंग सेवेवर बंदी आली आहे. साेबतच चालकांना न्यूक्लिक अॅसिड टेस्ट व डाेस घेण्यास सांगण्यात आले आहे.
काेराेना महामारी वाढल्यानंतर जागतिक आराेग्य संघटनेने २०२१ मध्ये काेराेना हर्ड इम्युनिटीची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले. हर्ड इम्युनिटी म्हणजे आजाराबाबत माेठ्या लाेकसंख्येमध्ये अँटिबाॅडी विकसित करण्याची स्थिती हाेय. संसर्गाद्वारे किंवा लसीकरणाद्वारे हे शक्य हाेते. आधी ६० ते ७० टक्के लाेकांनी बाधित व्हावे किंवा त्यांचे लसीकरण करण्यात यावे. हर्ड इम्युनिटी वाढेल, असे गृहीतक मांडले जात हाेते. परंतु आता हेच प्रमाण ८५ ते ९० टक्के असेल तरच हर्ड इम्युनिटी येईल, असा दावा केला जाताे.