अजित पवारांचा कामाचा धडाका मॅरेथॉन बैठका घेत निर्णयांचा सपाटा.

Spread the love

 महाराष्ट्र २४ मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता झपाटून कामाला सुरुवात केलीय. आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री या नात्याने काही महत्त्वाच्या गोष्टींचा निर्णय घेत आपणच या सरकारमध्ये ‘दादा’ आहोत हे दाखवून दिलंय. वाडीया रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावणे, ईस्टर्न फ्री वेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव देणं आणि राज्यातील गुन्हेगारी संपवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश देत अजित पवार यांनी प्रशासनावर असलेला आपला वचक दाखवून दिलाय.

खरंतर आज वाडीया रुग्णालयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलवली होती. पण त्या आधीच अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मीला ठाकरे यांच्यासोबत बैठक घेत रुग्णालयासाठी ४६ कोटी रुपये देण्यात येणार आहेत असं सांगत प्रश्न मार्गी लावला आणि एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावर मात केली. तसंच अनेकदा सार्वजनिक ठिकाणांना होणारा वाद पाहता पवार यांनी ईस्टर्न फ्री वेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव देत यातही बाजी मारली.

हा मार्ग एमएमआरडीए म्हणजे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत येतो. पण इथेही दादांनी बाजी मारली. तसंच राज्यातील विशेषत: नागपूरमधील वाढत्या गुन्ह्यांची दखल घेत लागेबांधे न  पाहता कठोर कारवाई करा असे निर्देश दिले आहेत.असं करत असताना नागपूरच्याच आणि आपल्याच पक्षाचे गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखांनाही त्यांच्या खात्यात आपणच बॉस असल्याचं दाखवून दिलंय. अजित पवारांच्या कामाचा उरक, वेग आणि धडाक्याची ही सुरुवात आहे असं मानलं जातं. त्यामुळे आगे आगे देखीये होता है क्या अशी चर्चा सरकारी दरबारात सुरु झाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *