महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २३ जानेवारी – बाळासाहेबांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुणे येथे झाला. लहानपणापासूनचे प्रबोधनाचे संस्कार, दिवसागणिक मनावर कोरली जाणारी स्वातंत्र्यलढय़ाची गाथा आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राची प्रखर चळवळ यांतून बाळासाहेबांची वैचारिक दिशा स्पष्ट होत गेली, आणि बाळासाहेब ठाकरे ही एक झंझावाती शक्ती म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास येऊ लागली. मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी गेली ४६ वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळ केशव ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला. सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती ‘व्यंगचित्रकार बाळ ठाकरे’ यांच्या कुंचल्यात होती, तीच शक्ती ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती. मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून गेली तब्बल ४६ वर्षे अविरतपणे चालविला आणि पार पाडला..
फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्रकार म्हणून आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात करणारे बाळासाहेब ठाकरे यांना वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा लाभला होता. आपल्या लेखणीतून, व्याख्यानांतून आणि लोकजागरण मोहिमांमधून समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर कोरडे ओढणारे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन . १९६० मध्ये ‘फ्री प्रेस’मधील व्यंगचित्रकाराची नोकरी सोडून बाळासाहेबांनी स्वत:चे मार्मिक हे मराठीतील पहिले राजकीय आणि व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले, आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या हक्काची पहिली लढाई सुरू झाली. मुंबईतील परप्रांतीयांमुळे मराठी माणसाच्या भूमिपुत्र म्हणून असलेल्या हक्कांवर गदा येत असल्याची आरोळी ‘मार्मिक’मधून घुमली आणि बाळासाहेब ठाकरे या नावाचे मराठी मनांवरील राज्य सुरू झाले.. मराठी माणसावरील अन्याय केवळ व्यंगचित्रे काढून दूर होणार नाही, त्यासाठी अधिक संघटित प्रयत्न हे वास्तव जाणलेल्या बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना काढण्याचा निर्णय घेतला.. प्रबोधनकारांशी आणि सहकाऱ्यांशी दीर्घ विचारविनिमय झाला, आणि संघटनेचे नाव निश्चित झाले. १९ जून १९६६ या दिवशी महाराष्ट्रात शिवसेना नावाच्या संघटनेचा जन्म झाला, आणि बाळासाहेब ठाकरे यांना उभा महाराष्ट्र ‘शिवसेनाप्रमुख’ म्हणून ओळखू लागला.. अमोघ वक्र्तृत्वाबरोबरच, भेदक व मनाचा ठाव घेणारे प्रभावशाली लेखन ही बाळासाहेबांची खास शैली होती. बाळासाहेबांच्या लेखनालादेखील त्यांच्या प्रखर भाषणांइतकीच प्रभावी धार होती, म्हणूनच महाराष्ट्रात त्यांच्या लेखन आणि भाषणांना ठाकरी शैली अशी अनोखी ओळख मिळाली.
आक्रमक हिंदुत्वाचा आणि कडव्या मुस्लिमविरोधाचा प्रखर पुरस्कार करताना बाळासाहेब ठाकरे अनेकदा टीकेचे आणि वादाचेही धनी झाले, पण आपल्या प्रत्येक शब्दाशी ठाम राहण्याच्या स्वभावातून त्यांनी यावरही मात केली. गुळमुळीत लोकशाहीपेक्षा रोखठोक ठोकशाही चांगली असे सांगत त्यांनी अनेकदा सत्ताधीशांना धारेवर धरले. कलेची जाण असलेला हिटलर हा त्यांचा आदर्श होता, तसे ते बोलूनही दाखवीत. त्यांच्या या रोखठोक स्वभावामुळेच, बाळासाहेबांच्या केवळ आदेशानिशी प्राण पणाला लावण्याची तयारी असलेल्या कडव्या शिवसैनिकांची फौज मुंबईतच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्रात निर्माण झाली. शिवसैनिक हा माझा प्राण आहे, ही माझी संपत्ती आहे आणि ऊर्जा आहे असे सांगत सामान्य शिवसैनिकाच्या हृदयात घर करणाऱ्या या असामान्य नेत्याने आपल्या अखेरच्या भाषणातही, त्याचाच पुनरुच्चार केला होता. माझे हृदय तुमच्यापाशी आहे, असे सांगत बाळासाहेबांनी असंख्य शिवसैनिकांची हृदये काबीज केली.. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मराठी माणसाच्या हृदयातील स्थान यापुढेही अढळ राहणार आहे..