महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २३ जानेवारी – फुलांची सजावट, आकर्षक रोषणाई आणि ठिकठिकाणी डौलाने फडकणाऱया भगव्या झेंडय़ांमुळे संपूर्ण पर्ह्ट परिसर भगवामय झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या, 23 जानेवारी रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे, पर्यटन-पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा होणार आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा गेट वे ऑफ इंडियाजवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील बेटावर उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी 23 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता होत आहे.
असा आहे दिमाखदार पुतळा
शिवसेनाप्रमुखांच्या या पुतळय़ाची उभारणी प्रबोधन प्रकाशनच्या वतीने करण्यात आली आहे.
पुतळा 9 फूट उंच असून बाराशे किलो ब्राँझपासून बनविण्यात आला आहे.
पुतळा दोन फूट उंच हिरवळीसह सुमारे 14 फूट उंचीच्या चौथऱयावर बसविण्यात आला आहे.
पुतळा शिल्पकार शशिकांत वडके यांनी बनवला आहे.
फुलांची सजावट, आकर्षक रोषणाई, फोर्ट परिसर भगवामय