भडका; पेट्रोल-डिझेल वाढीनंतर आता गॅस सिलेंडर दरात २५ रुपयांची वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.४। नवीदिल्ली । जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे दर भडकल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यानी गुरुवारी पेट्रोल-डिझेल दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ केली. दुसरीकडे विना अनुदानित गॅस सिलेंडर दरातही 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी ताजी दरवाढ आणखी हैराण करणारी ठरणार आहे. (petrol, diesel and gas cylinder rate hiked)

जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे दर 59 डॉलर्स प्रती बॅरलवर पोहोचले आहेत. त्याचवेळी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होत असल्याने पेट्रोल-डिझेल दरात वाढ करावी लागत असल्याचे तेल कंपन्याकडून सांगण्यात आले आहे. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे प्रतिलीटरचे दर 86.65 रुपयांवर गेले आहेत. डिझेलचे दर देखील 35 पैशांनी वाढून 76.83 रुपयांवर गेले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर अनुक्रमे 93.20 आणि 83.67 रुपयांवर गेले आहेत. चेन्नईमध्ये हेच दर अनुक्रमे 89.13 आणि 82.04 रुपयांवर तर कोलकाता 88.01 आणि 80.41 रुपयांवर गेले आहेत.

देशातील बहुतांश शहरात पेट्रोलचे दर आजवरच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. इंधन दरवाढीचा थेट परिणाम महागाई वाढण्यावर होणार आहे. विशेषतः डिझेल दरवाढीचा परिणाम अनेक क्षेत्रांवर होतो. यामुळे शेतकऱ्यांचा कृषीवरील खर्च वाढतोच. पण मालवाहतुकीचे भाडे वाढल्याने महागाईला चालना मिळते. अलीकडेच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर कृषी उपकर लावला होता. पेट्रोलवर हा उपकर अडीच रुपयांचा असून डिझेलवर तो चार रुपयांचा आहे. उपकराचा थेट फटका ग्राहकांना बसणार नसल्याचे त्यावेळी सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते.

दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यानी विना अनुदानित गॅस सिलेंडर दरात 25 रुपयांनी वाढ केली आहे. या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये गॅस सिलेंडरचे दर 719 रुपयांवर पोहोचले आहेत. कोलकाता येथे हेच दर 745.50 रुपयांवर गेले असून मुंबईत ते 710 रुपये तर चेन्नईमध्ये ते 735 रुपयांवर गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *