महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.५। मुंबई । करोना विषाणू संसर्गाच्या टाळेबंदी शिथिलीकरणानंतर सुरू झालेल्या रेल्वेच्या लोकलगाड्यांमध्ये सर्वसामान्यांना प्रवासाची मुभा मिळाली असतानाच, आता रेल्वे अपघातातील जखमींवर तसेच रुग्णांवर मोफत प्राथमिक उपचार करणाऱ्या वन रुपी क्लिनिकने आता रेल्वे तिकीट दाखवा आणि ५० रुपयांत ईसीजी काढा, असा अनोखा उपक्रम गेल्या तीन दिवसांपासून सुरू केला आहे. ठाणे स्थानकात हा उपक्रम सुरू करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने तो इतर स्थानकांतही सुरू केला जाणार आहे. या उपक्रमाचा फायदा दिवसाला सरासरी २५ रुग्ण घेत असून रेल्वे प्रवाशांना या उपक्रमाच्या माध्यमातून वर्षभर ही सुविधा मिळणार आहे.
रेल्वे अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने आणि वेळेवर प्राथमिक उपचार मिळाले नाही तर त्यांचा मृत्यू होऊ शकतो. नेमकी ही बाब लक्षात घेऊन ‘मॅजिक दिल’ या संस्थेने रेल्वेच्या माध्यमातून वन रुपी क्लिनिकचा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून सुरू केला आहे. रेल्वे स्थानकाच्या फलाटांवर उभारण्यात आलेल्या दवाखान्यांमध्ये रेल्वे अपघातातील जखमींवर मोफत उपचार करण्यात येतात. याशिवाय, रेल्वे स्थानकामध्ये एखाद्या प्रवाशाला काही त्रास जाणवत असेल तर, अशा प्रवाशांवरही प्राथमिक उपचार केले जातात. या दवाखान्यामुळे प्राथमिक उपचार मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत. तसेच या दवाखान्यामध्ये अनेक महिलांची सुखरूप प्रसूती झाली आहे. मात्र करोनाच्या काळात रेल्वेची वाहतूक बंद असल्याने ही सेवाही बंद पडली होती. परंतु आता ही सेवा पुन्हा एकदा सुरू झाली असून त्यांनी आता प्राथमिक उपचाराबरोबरच आरोग्य तपासणीचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचा एक भाग म्हणून रेल्वे तिकीट दाखवा आणि ५० रुपयांमध्ये ईसीजी काढा, असा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. तीन दिवसांपासून सुरू झालेल्या या उपक्रमात दिवसाला सरासरी २५ रुग्ण घेत असून रेल्वे प्रवाशांना या उपक्रमाच्या माध्यमातून वर्षभर ही सुविधा मिळणार आहे.