सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचं नामकरण ; नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बॉलिंग एण्डची नावं ही आहेत

Spread the love

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२४। अहमदाबाद । जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचं नामकरण करण्यात आलं आहे. या स्टेडियमला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं आहे. पुनर्विकसित करण्यात आलेल्या या मैदानावर आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. मात्र सामना सुरु होण्याआधीच या स्टेडियमचे नाव बदलण्यात आल्याची बातमी समोर आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटरवरही या स्टेडियमची चर्चा आहे. #नरेंद्र_मोदी_स्टेडियम, #नरेन्द्र_मोदी_स्टेडियम_मोटेरा असे हॅशटॅग ट्विटरवर चर्चेत आहेत. मात्र त्याचवेळी #सरदार_पटेल_का_अपमान हा हॅशटॅगही चर्चेत असून नवीन स्टेडियमचे नाव बदलण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे ही नाराजी व्यक्त करताना अनेकांनी या स्टेडियममधील स्टॅण्ड म्हणजेच आसन व्यवस्था असणाऱ्या विभागांच्या नावांकडे लक्ष वेधलं आहे.

आजचा भारत इंग्लंड सामना सुरु होण्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते. या मैदानाची आसन क्षमता एक लाख ३२ हजार इतकी आहे. या उद्घाटन प्रसंगी बोलताना अमित शाह यांनी आता अहमबाद हे शहर स्पोर्ट्स सिटी म्हणून ओळखलं जाईल असं म्हटलं. मोदी हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून त्याचं स्वप्न होतं जे आज पूर्ण झालं आहे, असंही शाह म्हणाले.

सोशल नेटवर्कींग साईट्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियमवर अदानी एण्ड आणि रिलायन्स एण्ड असल्याकडे नेटकऱ्यांनी लक्ष वेधलं आहे. सध्या सुरु असणाऱ्या सामान्यामध्येही ज्या दोन बाजूंनी गोलंदाजी केली जात आहे त्या एण्डच्या नावांचा वारंवार उल्लेख होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *