Gym करताना ही काळजी घ्या ; नाहीतर मोजावी लागेल मोठी किंमत

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २ – पुणे – अनेकदा तरुण मुलं कोणत्याही प्रशिक्षकाशिवाय (Gym Trainer) व्यायाम करतात. चुकीच्या पद्धतीनं व्यायाम केल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, हे लक्षात न घेता वजन उचलण्याचे व्यायामही चुकीच्या पद्धतीनं केले जातात. ज्यामुळे मोठा धोका उद्भवू शकतो.तुम्हीदेखील जीममध्ये जात असाल आणि अशाच काही चुका करत असाल तर त्या टाळा. आपण वजन उचलतो तेव्हा आपण दीर्घ श्वास घेऊन काही क्षणांसाठी तो रोखून ठेवतो. मात्र ही सवय जिममध्ये वजन उचलण्याचा व्यायाम करताना धोकादायक ठरू शकते. जिममध्ये वारंवार असं केलं तर तुमचं ब्लडप्रेशर (Blood Pressure) वाढून तुम्ही बेशुद्धही पडू शकता.त्यामुळे वजन उचलण्याचा (Weight Training) व्यायाम करताना श्वासोच्छ्वासावर (Respiration) विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. कधीही वजन उचलाल तेव्हा प्रथम श्वास सोडा आणि मग वजन उचलण्याच्या स्थितीत या. आता दीर्घ श्वास घ्या. यामुळं तुमचं ब्लडप्रेशर योग्य राहील.

जिममधील प्रशिक्षक व्यायाम करवून घेताना रोज शरीरातील वेगवेगळ्या स्नायूंसाठी (Muscles) वेगवेगळे व्यायाम घेतात. जेव्हा आपले आपण जिममध्ये व्यायाम करतो तेव्हा रोज एकच व्यायाम करतो. हे चुकीचं आहे. कोणत्याही स्नायूंचा व्यायाम केला जातो तेव्हा त्यांची कार्यक्षमता पूर्ववत होण्यास 48 तास लागतात. त्यामुळे प्रत्येक स्नायूच्या व्यायामात दोन दिवसांचे अंतर ठेवणं आवश्यक आहे.

आज एका प्रकारच्या स्नायूचे व्यायाम केला तर दुसऱ्या दिवशी त्याच स्नायूचे व्यायाम न करता दुसऱ्या प्रकारच्या स्नायूचे व्यायाम केले पाहिजेत. यासाठी रोज कोणत्या स्नायूचे व्यायाम करणार हे निश्चित करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, आठवड्याच्या पहिल्या दिवशी छातीचे स्नायू, नंतर पाठीचे आणि मग पायांचे. यामुळं स्नायूना आवश्यक ती विश्रांती मिळते आणि त्यांची कार्यक्षमता सुधारते.

प्रशिक्षकाशिवाय तुम्ही वजन उचलण्याचे व्यायाम करत असाल, तर तुम्ही योग्य पद्धतीनं वजन उचलता आहात ना, वजन उचलताना तुमची शारीरिक स्थिती (पोश्चर) (Body Posture) योग्य आहे ना? याची खात्री करणं आवश्यक आहे. यासाठी प्रशिक्षकांच्या उपस्थितीत व्यायाम करणं अत्यावश्यक आहे. योग्य पद्धत आणि तंत्र यामुळे तुमचे स्नायू वेगानं मजबूत होतील आणि दुखापतीची शक्यताही कमी होईल. याकरता थोडा अधिक खर्च करावा लागेल, पण तो सत्कारणी लागेल. तुमच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *